चिंताजनक ! पुणे शहराचा कोरोना ‘पॉझिटिव्हिटी रेट’ होईना कमी; राज्य व देशापेक्षा अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 12:11 PM2020-10-05T12:11:39+5:302020-10-05T12:15:09+5:30
१०० चाचण्यांमागे २३ जण बाधित
पुणे : शहरात रुग्णालय व घरी उपचार घेत असलेल्या रुग्णांचे प्रमाण कमी होत असले तरी दैनंदिन चाचण्यांच्या तुलनेत आढळून येणाऱ्या नवीन रुग्णांचे प्रमाण म्हणजे ‘पॉझिटिव्हिटी रेट ’अजूनही २३ टक्क्यांच्या पुढे आहे. राज्यात हे प्रमाण सुमारे २० टक्के असून देशाचा दर जवळपास ८ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. पण मागील आठवडाभरात शहराचा हा दर किंचितपणे कमी होताना दिसत आहे.
नव्याने आढळून येणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण मागील काही दिवसांपासून काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. तर दुसरीकडे चाचण्यांमध्येही सातत्य राहिलेले नाही. दैनंदिन चाचण्यांची संख्या मागील १५ दिवसांत कमी झाली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या १५ दिवसांत दररोज सरासरी ६ हजारांहून अधिक चाचण्या होत होत्या. त्यामुळे सध्या नवीन रुग्णांचे प्रमाण कमी असले तरी पॉझिटिव्हिटी रेट जवळपास स्थिर राहिल्याचे चित्र आहे. शनिवारपर्यंत १०० चाचण्यांमागे २३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसत होते. जुलै महिन्यात हे प्रमाण १५ एवढे होते. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात हा आकडा २० च्या पुढे गेला.
दि. १ ते १४ सप्टेंबर या कालावधीतत झालेल्या एकुण चाचण्यांच्या तुलनेत हा दर जवळपास ३० टक्क्यांवर पोहचला होता. पण त्यानंतर मागील हे प्रमाण कमी होत गेल्याचे दिसते. तर दि. ३ ऑक्टोबरपर्यंत हा दर जवळपास २३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. पण हा दर कमी होण्याचे प्रमाण सध्या खुप कमी आहे. राज्यातील हे प्रमाण सध्या २० टक्क्यांवर असले तरी मागील काही दिवसांपासून स्थिर आहे. तर देश पातळीवर हे प्रमाण केवळ ८ टक्के आहे. पुण्याप्रमाणेच यामध्ये हळुहळू घट होत चालली आहे.
-----------------
शहरात चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण (टक्केवारी)
दिवस एकुण चाचण्या एकुण बाधित बाधित प्रमाण
३ ऑक्टोबर ६,४३,०२० १,४८,४०६ २३.०७
१५ सप्टेंबर ५,४२,९४६ १,२२,४४८ २२.५५
१ सप्टेंबर ४,५७,८०६ ९७,०६८ २१.२०
१५ ऑगस्ट ३,५४,१०२ ७२,५७६ २०.४९
१ ऑगस्ट २,७९,२५५ ५५,७६१ १९.९६
१४ जुलै १,७१,७७२ २९,१०७ १६.९४
१ जुलै १,२०,०५८ १८,१०५ १५.००
---------------------------------------------------------
दि. ३ ऑक्टोबरची स्थिती
शहर - २३.०७ टक्के
राज्य - २०.३३ टक्के
देश - ८.३२ टक्के
-------------------
पॉझिटिव्हिटी रेट कमी करायचा असेल तर चाचण्या वाढविणे आवश्यक आहे. हा दर ५ टक्क्यांच्या खाली आला तर ही साथ नियंत्रणात आली, असे आपण म्हणू शकतो. सध्या नवीन रुग्ण कमी आढळून येत असले तरी त्यांच्यामुळे इतर अनेकांना संसर्ग होत आहे. त्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगद्वारे व सुपरस्प्रेडरच्या चाचण्या अधिक वाढवायला हव्यात.
- डॉ. स्नेहल शेकटकर, शास्त्रज्ञ, सेंटर फॉर मॉडलींग अँड सिम्युलेशन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व इंडियन सायंटिस्ट्स रिस्पॉन्स टु कोविड
---------------