पुणे : येरवडा येथील एका तीस वर्षीय तरूणाला शुक्रवारी (दि.१) श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु , नंतर त्याची कोरोना तपासणी चाचणी केली असता त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, अवघ्या चारच दिवसात त्याचा उपचारादरम्यान सोमवारी (दि.४ )मृत्यू झाला. त्यानंतर तो दारु विक्री करत होता व त्यादरम्यानच त्याला कोरोनाची लागण झाल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली. परंतु, हा तरुण दारु विक्रेता असल्याची कोणतीही नोंद पोलिसांकडे नसल्याची बाब समोर आली आहे. तसेच तो गेले काही दिवस आजारी होता व त्याला कोरोनासोबतच मधुमेहाचा देखील आजार होता अशी माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाबाधित त्या तरुणाच्या कुटुंबातील आठ जणांची कोरोना तपासणी केली असता सर्वजणांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे अहवालात स्पष्ट झाले. येरवड्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून सुमारे दोनशे हून अधिक रूग्ण येरवडा क्षेत्रीय कार्यालय विभागात आहेत. या गंभीर आजारामुळे आतापर्यंत येरवड्यातील आठ रुग्णांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. त्यात एका तीस वर्षीय तरूणाचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला आहे. मात्र अजूनही येरवडा व परिसरातील नागरिक कोरोनाबाबत गंभीर नाहीत. त्यामुळे या परिसरात कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे.वाढत्या आजाराचा धोका लक्षात घेता नियमांचे उल्लंघन करणा?्यांवर प्रशासनाने कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे.
येरवडा परिसरात मोठ्या प्रमाणावर हातभट्टीसह अवैध दारूची विक्री केली जाते. लाँकडाऊन नंतर तेथे चढ्या दराने विक्री सुरू होती. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या तरूणाबाबत तो दारू विक्री करत होता अशी कोणतीच नोंद पोलिसांकडे नाही. कंजारभाट समाजातील तरुणाच्या मृत्यूमुळे परिसरात नागरिकांना धक्का बसला आहे. महापालिकेच्या वतीने सदरचा परिसर सील करण्यात आला आहे.
येरवडा क्षेत्रीय कार्यालय विभागात लक्ष्मीनगर, पर्णकुटी पायथा, मदर तेरेसा नगर, यशवंत नगर सह नागपूरचाळ, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, टिंगरेनगर, कळस, इंदिरा नगर, या परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. हा संपूर्ण परिसर कन्टेन्मेंट झोन असून नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र नागरिक अजून ही गंभीर नाहीत. अनावश्यक रस्त्यावर फिरणे, भाजी व वस्तू खरेदीसाठी गर्दी करणे यामुळे आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता आगामी काळात पोलिस प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
..............................
येरवडा भाटनगर येथील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या तरूणावर येरवडा पोलिस स्टेशन येथे अवैध दारूविक्री अथवा इतर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल असल्याची नोंद मिळून येत नाही - युनुस शेख वरिष्ठ पोलिस निरीक्षक, येरवडा पोलिस स्टेशन.