पुणे : पुणे शहरातील (पुणे महापालिका हद्दीत) कोरोनाबाधित रूग्णांचे मृत्यू सत्र रविवारपासून थांबले असून, सोमवारीही एकही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही़ दुसरीकडे कोरोनाबाधित रूग्ण या आजारातून बाहेर पडू लागले असून, आज आणखी १३ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. दरम्यान, आज आणखी ८० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. यामुळे पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ६६६ एवढी झाली आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी सातपर्यंत नव्याने आढळून आलेल्या ८० रूग्णांपैकी नायडू हॉस्पिटलमध्ये ४६, ससून हॉस्पिटलमध्ये १९, रूबी हॉल हॉस्पिटलमध्ये ५, बुधराणी हॉस्पिटलमध्ये १, जहाँगिर हॉस्पिटलमध्ये १, भारती हॉस्पिटलमध्ये ४, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये २ व केईएम हॉस्पिटलमध्ये २ कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. लॉकडाऊननंतर ६ एप्रिल पासून शहरातील सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण असलेला भाग सील करून, सुरू केलेल्या विशेष तपासणी मोहिमेमुळे दिवसागणिक नवीन कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असून, रविवारपर्यंत असलेली ५८६ कोरोनाबाधित रूग्ण संख्या आज ६६६ वर गेली आहे. यापैकी ५० जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीला १४ रूग्णांची प्रकृती गंभीर आहे. यामध्ये ससूनमधील ९, भारती व सिम्बॉयसिस हॉस्पिटलमधील प्रत्येकी २ व दिनानाथ हॉस्पिटलमधील १ रूग्णाचा समावेश आहे.लॉकडाऊन व आता संपूर्ण पुणे शहर सील करून राबविण्यात येणाऱ्या विशेष तपासणी मोहिमेमुळे दिवसागणिक नवीन कोरोनाबाधित रूग्णांची मोठी वाढ समोर येत आहे. ७३९ वैद्यकीय पथकांच्या मार्फत आत्तापर्यंत ३७ लाख ३७ हजार २१ जणांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी संशयित म्हणून गणले गेलेल्या १ हजार ५५३ जणांचे स्क्रिनिंग करण्यात येत आहे.
Corona virus : समाधानकारक! पुण्यात सोमवारी एकही मृत्यू नाही; कोरोना बाधितांच्या संख्येत मात्र ८० ने वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 7:49 PM
आज नव्याने १३ कोरोनाबाधित पूर्णपणे बरे होऊन घरी परतले
ठळक मुद्देपुणे शहरात प्रशासनाने संचारबंदी केली कडक केली पर्यायी रस्तेही आता बंद