पुणे : शहरातील कोरोनाग्रस्त रूग्णांचा एकूण आकडा ७ हजार ८९ वर जाऊन पोहचला असून बुधवारी दिवसभरात २९४ रूग्णांची नोंद करण्यात आली. दिवसभरात बरे झालेल्या २२९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील १६५ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ०८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात ऍक्टिव्ह रुग्ण २ हजार ३८९ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
बुधवारी रात्री आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या २९४ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १७, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये २२२ तर खासगी रुग्णालयांमध्ये ५५ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १६५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४३ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १२२ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत.
शहरात बुधवारी ०८ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३५२ झाली असून यामध्ये ग्रामीणमधील दोघांचा समावेश आहे. दिवसभरात एकूण २२९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील १८५ रुग्ण, ससूनमधील ०६ तर खासगी रुग्णालयांमधील ४८ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ३४८ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या २ हजार ३८९ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १२४९ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ५३ हजार ७०९ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये १६८०, ससून रुग्णालयात १६२ आणि खासगी रुग्णालयांमध्ये ५४७ रुग्ण उपचार घेत आहेत.