पुणे : हवेली तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत तब्बल तीन पटीने वाढ झाली आहे. तालुक्यात १५ जून रोजी १४४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होते. आज ही ३० जून रोजी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तब्बल ३२८ झाली आहे. यामुळे संपूर्ण हवेली तालुका कोरोनाच्या विळाख्यात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये नोकरी-व्यवसायानिमित्त गावांमधून दररोज जाणाऱ्या व्यक्तींकडून हमीपत्र लिहून घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसे आदेश पंचायत समितीच्या वतीने सर्व ग्रामपंचायतींना दिले आहेत.
हवेली तालुक्यामध्ये आतापर्यंत कोरोनाचे ३२८ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यातील १७५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. सध्या १४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तालुक्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या केवळ ४० होती, आज १४७ वर जाऊन पोहचली आहे. यामध्ये प्रामुख्याने पुणे शहर आणि परिसरामध्ये दररोज ये-जा करणाऱ्या नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचा रुग्णांमध्ये समावेश आहे.
हवेली तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने वाघोली, कदमवाक वस्ती, मांजरी आणि नऱ्हे आंबेगाव या गावांमध्ये पंधरा दिवसांपूर्वीच बारामती पॅटर्न लागू केला होता. परंतु गावकऱ्यांनीच या प्रकारच्या अंमलबजावणीस विरोध केल्याने कंटेन्मेंट झोनची अधिसूचना अंमलबजावणीचे आदेश मागे घेतले होते. नागरिकांकडून स्वयंशिस्त पाळली जात नाही, तसेच पुणे शहरातील रेडझोन क्षेत्रांमधून जा ये करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तसेच शहरातील रुग्णालयांमध्ये काम करणारे डॉक्टर आणि परिचारिका तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचा बहुतांश कर्मचारी वर्ग हा हवेली तालुक्याच्या ग्रामीण क्षेत्रांमध्ये राहत असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.हवेली पंचायत समितीने गावांमधून पुणे शहरांमध्ये दररोज नोकरी आणि व्यवसायनिमित्त जाणाऱ्या नागरिकांकडून हमीपत्र लिहून घेण्याचे आदेश ग्रामपंचायतींना दिले आहेत. यामध्ये संबंधित व्यक्ती पुणे शहरामध्ये कोणत्या ठिकाणी कामाला आहे, काय काम करते, दिवसभरात त्यांना कामानिमित्त कोठे फिरावे लागते, ते क्षेत्र कंटेन्मेंट झोनमध्ये आहे या सर्वबाबींचा अंतर्भाव हमीपत्रमध्ये आहे. तसेच कोरोनाविषयक नियमावलीची देखील हमी या व्यक्तीकडून घेतली जात आहे.