पुणे : पुणे शहरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून, शुक्रवारी पुण्यामध्ये नव्याने १४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे़. दरम्यान नायडू हॉस्पिटलमध्ये कोरोना संसर्ग झालेल्या संशयितांना दाखल करण्याची प्रक्रियाही वाढत असून, त्यांचे घशातील स्त्रावांचे नमूने तपासणीसाठी लागलीच प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत़. यापैकी सायंकाळपर्यंत अकरा जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले़ तर रात्री नऊपर्यंत आणखी तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे़. दरम्यान कोरोनाचा संसर्ग झालेल्यांचा हा आकडा येत्या काही दिवसांमध्ये आणखी वाढण्याची भिती वर्तविण्यात येत आहे़ .
पुणे विभागात शुक्रवारी सायंकाळी कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या १०१ होती़ यामध्ये पुणे शहरातील ५१, पिंपरी चिंचवडमधील १४ व जिल्ह्यातील ६ जणांचा समावेश होता़ रात्री उशिरा हाती आलेल्या माहितीनुसार यामध्ये पुणे शहरातील आणखी ३ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची वाढ झाली असून, हा आकडा ७४ वर गेला आहे़ या पॉझिटिव्ह अहवालांमध्ये ससून सर्वोपचार रूग्णालयातील ३ जणांचे, नायडू हॉस्पिटलमधील सात जणांचे व तीन खाजगी हॉस्पिटलमधील प्रत्येकी एक जणांचा अहवालाचा समावेश आहे़ गुरूवारपर्यंत संपूर्ण पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची ही संख्या ६० होती ती एका दिवसात १४ ने वाढली आहे़ सध्या नायडू हॉस्पिटलमध्ये संशयित म्हणून दाखल करण्यात आलेल्या ५७ जणांचे तपासणी अहवाल येणे अद्याप बाकी आहेत़