सुषमा नेहरकर-शिंदेपुणे : सध्या जिल्ह्यात सर्वांधिक म्हणजे तब्बल ६५० कोरोना बाधित रुग्णांवर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये दररोज किमान शंभर नवीन रुग्णांची भर पडत आहे. यामुळे या रुग्णांवर उपचार करणा-या डॉक्टरस्, नर्स आणि अन्य कर्मचा-यांची संख्या देखील वाढत आहे. यामुळे सध्या दररोज केवळ पीपीए किटवर तब्बल ५ लाख रुपयांचा खर्च होत असून, या खर्चामध्ये वाढ होत आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढतच आहे. आज अखेर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२ हजारांच्या वर पोहचली आहे. यामुळे ससून, नायडूसह अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये देखील कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु झाले आहेत. परंतु यापैकी सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण ससून रुग्णालयामध्ये आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील गंभीर रुग्ण देखील ससून रुग्णालयांमध्ये दाखल केले जात आहेत.
सध्या ससून रुग्णालयातील कोविड केअर सेंटरमध्ये सुमारे ६५० कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत असून, दररोज नव्याने शंभरहून अधिक रुग्ण दाखल होतात. यामुळे ही संख्या वाढत आहे. या रुग्णावर उपचार करण्यासाठी सिनिअर डॉक्टर, निवासी डॉक्टर, नर्स व अन्य कर्मचारी असे एकूण ६०० ते ७०० लोक दररोज थेट कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात येत आहेत.त्यामुळे या सर्व कर्मचा-यांना वैद्यकीय प्रामाणित पीपीए किट घालणे बंधनकारक आहे. याशिवाय नॉन कोविडमध्ये डिलेव्हरी व तातडीची सेवा कक्षामध्ये काम करणा-या डॉक्टर, नर्स व कर्मचा-यांना देखील पीपीए किट देणे आवश्यक आहे. ही संख्या लक्षात घेता पीपीए किटवर होणार खर्च वाढत आहे.-------------------पीपीए किटचा खर्च लोकांच्या देणग्यातूनससून रुग्णालयात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केले जात आहे. डॉक्टर, नर्स व कर्मचाऱ्यांना पीपीए किट घातल्यानंतर साधे पाणी देखील पिता येत नाही. यामुळे सहा-सहा तासांच्या ड्युट्या लावण्यात येत आहेत. यामुळे दिवसांला किमान ६०० ते ७०० कर्मचा-यांना दिवसाला ड्युटी करावी लागते. कोविड केअर सेंटरमध्ये ड्युटी करणार प्रत्येक कर्मचाऱ्यांना पीपीए किट घालणे बंधनकारक आहे. यामुळे सध्या दररोज पीपीए किटसाठी सुमारे पाच लाख रुपयांचा खर्च येत आहे. परंतु गेल्या तीन महिन्यांत बहुतेक सर्व पीपीए किटचा खर्च आता पर्यंत लोकांच्या देणग्यांमधून करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांत केळव दोन ते तीन वेळा प्रशासनाने निधी खर्च करुन हे किट खरेदी केले आहेत. परंतु आता दिवसेंदिवस हा खर्च वाढत आहे.- एस.चोक्कलिंगम, ससून रुग्णालय समन्वयक