पुणे : गेल्या काही दिवसांत ग्रामीण भागातील ६५ ग्रामपंचायतींमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोना हा उद्रेक जागीच रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने या सर्व "हाॅटस्पाॅट " ग्रामपंचायतीमध्ये घरोघरी जाऊन शंभर टक्के नागरिकांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी दिली. यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ व टेस्टिंग किटची तरतुद झाल्यानंतर त्वरीत ही तपासणी सुरू करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्याच्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. गेल्या दोन आठवड्यात ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. यामुळेच प्रशासनाने ग्रामीण भागातील 'हायरिस्क' काॅन्टॅक्ट लोकांची त्वरीत तपासणी करण्यात येत आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले, क्षेत्रातील ८० टक्के कोरोना रुग्ण हे लोकसंख्येने मोठे असणाऱ्या ६५ ग्रामपंचायतींमधील आहेत. तसेच यास ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये प्रादुर्भाव वाढत आहे. दररोज पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रुग्णांची संख्या देखील या गावांमध्ये जास्त आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या गावांमध्ये लक्ष केंद्रित केले आहे.जिल्ह्यातील ६५ मोठ्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात विशेष पथके नेमून घरोघरी सर्वेक्षण केले जाईल.सर्वेक्षणाबरोबरच तपासणी मध्ये आढळून येणाऱ्या संशयित व्यक्तींची कोरोना टेस्ट केली जागली यामध्ये लक्षणे असणारे आणि लक्षणें असणाऱ्या रुग्णांना विलगीकरण कक्ष आणि उपचारासाठी कोरोना रुग्णालयात दाखल केले जाईल. जेणेकरून संसर्ग थांबण्यास मदत होईल. मंचर आणि नारायणगाव येथे अशा प्रकारचे सर्वेक्षण केलेले आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने या सर्व हाॅटस्पाॅट ग्रामपंचायतीमध्ये हे सर्वेक्षण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.