पुणे : महापालिकेकडून नायडूसह महापालिकेतील अन्य रुग्णालयांमध्ये आॅक्सिजन सिलेंडर पुरविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असली तरी नायडू रुग्णालयात सिलेंडर अभावी रुग्णांचा जीव टांगणीला लागलेला असताना या प्रक्रियेत एवढे दिवस का घालविले, अशा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अत्यावश्यक बाब म्हणून नायडूला तातडीने सिलेंडर उपलब्ध करून देता आले असते. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या डॅशबोर्डनुसार, नायडू रुग्णालयामध्ये सध्या १५५ रुग्ण असून त्यापैकी ७० रुग्ण आॅक्सिजनवर तर ७ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तसेच दररोज १५ ते २० वाढीव रुग्णांना कमी-अधिक प्रमाणात आॅक्सिजनची गरज भासते. त्यामुळे मागील काही दिवसांपासून नायडूतील आॅक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. प्रत्यक्षात गरज आणि त्यातुलनेत आॅक्सिजन सिलिंडरची संख्या कमी असल्याने रुग्णांचा जीव टांगणीला लागलेला असतो. तरीही महापालिका प्रशासनाकडून नायडूला अतिरिक्त सिलिंडर पुरविण्याऐवजी इतर रुग्णालयांचा भार टाकला जात आहे. तातडीने अतिरिक्त सिलिंडर उपलब्ध करून देण्याऐवजी निविदा प्रक्रिया राबवून त्यामध्ये वेळ घालविला जात आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत अत्यावश्यक सेवेसाठी निविदा प्रक्रिया राबविण्याचे बंधन नसते. पण तरीही पालिका प्रशासनाकडून नायडूकडे दुर्लक्ष करून निविदा प्रक्रिया राबवून आॅक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्यासाठी पुरवठादार नेमण्याचा घाट घालण्यात आला. या प्रक्रियेला जवळपास १५ दिवस झाले आहेत. तसेच पुरवठादार नेमल्यानंतर त्याच्याकडून सिलिंडर मिळण्यास किमान आठवडाभर वेळ लागण्याची शक्यता आहे. एकीकडे दररोज बाधितांची संख्या तसेच गंभीर रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना प्रशासनाकडून निविदा प्रक्रियेत १५ ते २० दिवस घालविले जात आहे. याचा त्रास रुग्णांना सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. ------------------सिलेंडर पुरवठ्यासाठीचे पर्याय -- सध्याच्या निविदा प्रक्रियेअंतर्गत पुरवठादार नेमणे- सध्या नायडूला पुरवठा करणाºया पुरवठादाराकडून भाडेतत्वावर सिलेंडर घेणे- कायमस्वरूपी उपाय म्हणून नवीन सिलेंडर खरेदी करणे- नवीन सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत नायडूवरील बोपोडी व दळवी रुग्णालयाचा भार कमी करणे----------नायडूव्यतिरिक्त बोपोडी, दळवी, लायगुडे हॉस्पीटल, बालेवाडी यांसह काही कोविड सेंटरमध्ये एकुण किमान ५०० आॅक्सिजन बेडची सुविधा करण्याचे नियोजन आहे. निविदा प्रक्रियेतून एजन्सी निश्चित झाल्यानंतर आॅक्सिजन सिलिंडर पुरवठ्याची प्रक्रिया सुरळीतपणे होईल. तसेच नायडूलाही अतिरिक्त सिलिंडर देता येतील, असे महापालिकेतील आरोग्य अधिकायांनी सांगितले.---------------
--