पुणे : गेल्या काही दिवसांत संपूर्ण राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. यामध्ये प्लाझ्मा थेअरपीचा चांगला उपयोग होत आहे. परंतु प्लाझ्मा देण्यासाठी सध्या नागरिक पुढे येत नाहीत. भविष्यातील कोरोनाचा वाढाता धोका लक्षात घेता प्लाझ्मा बँक तयार करण्यात येणार असून, यासाठी कोरोनाच्या आजारातून बरे झालेल्या व्यक्तींने प्लाझ्मा देण्यासाठी पुढे यावे, असा आवाहन विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केले.
कोविड-१९ आजारातून उपचाराअंती बरे झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा (रक्तद्रव) जर कोरोनाबाधित असलेल्या गंभीर रुग्णाला दिल्यास त्या रुग्णाचा जीव वाचवण्याची शक्यता असते हे वैज्ञानिक संशोधनातून सिद्ध झाले आहे. परंतु असे लक्षात आले आहे की कोरोना आजारातून ब-या झालेल्या व्यक्ती प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येत नाहीत. परिणामी गंभीर कोरोना रुग्णांना प्लाझ्मा उपलब्ध होत नाही.
डॉ म्हैसेकर म्हणाले, प्लाझ्मा फेरेसिस ही प्रक्रिया रक्तदान प्रकियेप्रमाणेच आहे. प्लाझ्मा फेरेसिससाठी वापरले जाणारे एक अत्याधुनिक मशीन आहे. या मशीनचे वैशिष्ट्य असे की यामध्ये फक्त प्लाझ्मा घेतला जातो व बाकीचे रक्त प्लाझ्मा दान करणाऱ्या व्यक्तीला परत दिले जाते. ही प्रक्रिया अत्यंत सुरक्षित असून ती तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखालीच केली जाते. प्लाझ्मा दान करणारी व्यक्ती १८ ते ६० वयोगटातील असावी. प्लाझ्मा देणाऱ्या कोरोनामुक्त व्यक्तीची सर्वप्रथम वैद्यकीय तपासणी व इतर चाचण्या केल्या जातात आणि जर ती वैद्यकीयदृष्ट्या पात्र असेल तरच त्या व्यक्तीचा प्लाझ्मा घेतला जातो. या सर्व प्रक्रियेसाठी साधारण दीड ते दोन तास लागतात. प्लाझ्मा देणाऱ्या व्यक्तीस अजिबात अशक्तपणा अथवा थकवा जाणवत नाही. म्हणून सर्व करोनामुक्त व्यक्तींनी प्लाइमा दान करण्यास पात्र असल्यास प्लाझ्मा दान करुन गंभीर करोना रुग्णांना जीवनदान द्यावे, असे आवाहनही विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.