राजानंद मोरे-पुणे : प्लाझ्मा दान करण्यापुर्वी कोरोनामुक्त व्यक्तीच्या रक्तातील अँटीबॉडीचे प्रमाण मोजण्यासाठी 'टायटर' चाचणीची अट घालण्यात आली आहे. मात्र, या चाचणीसाठी कीट उपलब्ध नसल्याने सध्या केवळ रक्तामध्ये कोरोनाविरोधी अँटीबॉडी आहेत की नाही, हे पाहिले जात आहे. त्यानंतर प्लाझ्मा रुग्णाला दिला जात आहे. पण त्यामुळे भारतीय औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) घातलेल्या अटीचे उल्लंघन करावे लागत आहे. भारतात कुठेच टायटर चाचणी होत नसल्याने ही अट रद्द करण्याची मागणी रक्तपेढ्या व वैद्यकीय तज्ज्ञांकडून केली जात आहे.भारतात सध्या प्लाझ्मा थेरपीच्या अनेक ठिकाणी चाचण्या सुरू आहेत. या थेरपीमुळे अनेक कोरोनाबाधित रुग्ण बरे होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मागणीही वाढू लागली आहे. पण ही थेरपी अद्याप संशोधन पातळीवरच असल्याने 'डीसीजीआय'ने काही बंधने घातली आहेत. त्यामध्ये 'टायटर' चाचणी करणे आवश्यक असल्याचे मागर्दशक तत्वात म्हटले आहे. या चाचणीद्वारे कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीच्या रक्तामध्ये १:६४० यापेक्षा जास्त प्रमाणात अँटीबॉडी असतील तर ते रुग्णाला द्यावे, असे म्हटले आहे. पण ही चाचणी सध्या केवळ राष्ट्रीय विषाणु संस्थे (एनआयव्ही) मध्ये होते. त्यामुळे ससूनसह अन्य खासगी रुग्णालयांमध्ये ही चाचणी करणे शक्य होत नाही.-----------------धोका नाही'टायटर 'चाचणीसाठी स्वतंत्र कीट व मशीन असते. ते भारतात कुठेही उपलब्ध नाही. त्यामुळे सध्या अँटीबॉडी आहेत की नाही, हे पाहिले जात आहे. तसेच एका मशिनद्वारे अँटीबॉडी किती असाव्यात, याचा सर्वसाधारण अंदाज घेतला जात आहे. पण हे प्रमाण टायटर चाचणीप्रमाणे आहे की नाही हे सांगता येणार नाही. असे असले तरी कोरोनाविरोधी अँटीबॉडी तयार झालेल्या असल्याने त्याचे प्रमाण समजले नाही तरी रुग्णाला फायदाच होतो. त्याचा रुग्णांना काहीच धोका नाही, असे एका खासगी रुग्णालयातील रक्तपेढी प्रमुखांनी सांगितले.-----------------टायटर अभावी अडसरअँटीबॉडीची टायटर चाचणीची अट घालण्यात आल्याने सुरूवातीला 'एनआयव्ही'मधून ही चाचणी करण्यात आली. पण सध्या 'एनआयव्ही'वरील कामाचा ताण मोठ्या प्रमाणावर वाढल्याने तिथे तीन आठवड्यांहून अधिक कालावधी लागत आहे. त्यामुळे रुग्णालयात उपलब्ध एका मशिनद्वारे आतापर्यंत जमा झालेल्या प्लाझ्माचे सर्वसाधारण प्रमाण मोजले जात आहे. त्याशिवाय रुग्णांना प्लाझ्मा देता येत नाही. त्यामुळे ही अट शिथिल करण्याची मागणी सातत्याने केली जात असल्याचे एका रुग्णालयातील रक्तपेढी प्रमुखांनी सांगितले.-----------------'टायटर' चाचणी उपलब्ध नसल्याने 'आयसीएमआर'कडून प्रत्येक प्लाझ्माचा नमुना साठवून ठेवायला सांगितला आहे. त्यांच्याकडून नंतर त्याची चाचणी केली जाईल, असे म्हटले आहे. पण अद्याप चाचणी झालेली नाही. सध्या 'आयजाजी' चाचणीतून अँटीबॉडी आहेत की नाही हेच पाहिले जात आहे. त्यामुळे याबाबत संभ्रम आहे. टायटर चाचणी नसल्याने ही अट काढून टाकण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे पाठपुरावा केला जात आहे.- डॉ. अतुल कुलकणी, संचालक, जनकल्याण रक्तपेढी
corona virus : 'टायटर' चाचणीशिवाय होतेय प्लाझ्मा दान; अँटीबॉडीचे प्रमाण समजेना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 2:01 PM
भारतात कुठेच टायटर चाचणी होत नसल्याने ही अट रद्द करण्याची मागणी रक्तपेढ्या व वैद्यकीय तज्ज्ञांकडून केली जात आहे.
ठळक मुद्देभारतीय औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) घातलेल्या अटीचे करावे लागत आहे उल्लंघन