पुणे: पुणेकरांची काळजी वाढवणारी बातमी आहे. पुणे शहरातली रुग्ण संख्या आज एक लाखांचा टप्पा पार करेल. आत्ता ही संख्या ९७,००० च्या आसपास पोहोचली आहे. दररोज वाढणारी संख्या लक्षात घेता आजच्या दिवसात हा एक लाखाचा टप्पा पार करेल. देशात ही संख्या लक्षात गाठणारं हे पहिलं शहर ठरणार आहे.
पुण्या मुंबईसह संपूर्ण राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे. या कोरोना ग्रस्तांच्या वाढत्या संख्येने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.त्यातच पुणेकरांचं टेन्शन वाढवणारी माहिती समोर येत आहे. संपूर्ण राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्ण संख्या पुणे जिल्ह्यात आहे. आजमितीला जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या लाखाच्या घरात जाऊन पोहचली आहे.
पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात फेब्रुवारी महिन्यापासून प्रचंड वेगाने कोरोना रुग्ण आढळून येत आहे. मागच्या वर्षीपेक्षा एक एक नवे उच्चांक कोरोना रुग्णवाढीचा ठरतो आहे. यातच एकट्या पुणे शहरात गुरुवारी तब्बल 7 हजारांवर रुग्ण सापडल्याने सर्वसामान्य नागरिकांसह प्रशासनाचे देखील धाबे दणाणले आहे.शहरातील कोरोना बाधितांची टक्केवारी २९.७० इतकी आहे. पुणे शहरात मार्च महिन्यात ७०हजारांवर रुग्ण वाढले आहे. ८ एप्रिलपर्यंत तब्बल ३१ हजार रुग्ण आढळून आले आहे.या वेगाने वाढणाऱ्या कोरोना बाधितांच्या संख्येला रोखण्यासाठी जिल्हा आणि महापालिका प्रशासन विविध मार्गांचा अवलंब करत आहे. कठोरात कठोर निर्बंध लादून देखील ही रुग्णवाढ दिवसेंदिवस वाढतच आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यात एकूण सक्रिय रुग्णसंख्या ९७,२४२, मुंबई ८३,६९३, नागपूर ६१,७११, नाशिक ३४,९१९, अहमदनगर १५, २९२, औरंगाबाद १८, ०८२, बीड ५४२९, सोलापूर ७३३४, नांदेड ११,६५९ असून सर्वात कमी सक्रिय रुग्णसंख्या ही कोल्हापूर जिल्ह्यात असून १५६१ आहे.
पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम वेगात सुरू आहे.मात्र,लसींचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यातील अनेक लसीकरण केंद्र बंद करावी लागली आहे. मागील बुधवारी केंद्राकडून जिल्ह्याला ३ लाख २५ हजार लसींचा पुरवठा करण्यात आला होता. मात्र, कोरोनाचा उद्रेक पाहता आणखी लसींचा पुरवठा मिळणे गरजेचे आहे.
कोरोना रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यात मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र तरीदेखील नागरिकांकडून परिस्थितीचे गांभीर्य ओळखले जात नसून नियमांचे सर्रास उल्लंघन करत आहेत. आतापर्यंत शहरात जवळपास सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांकडून १५ कोटींच्या वर दंड वसूल करण्यात आला आहे.