Corona virus :राज्यात पुणे जिल्हा बनतोय 'हॉटस्पॉट'; आकडेवारीतील घोळ अद्याप सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 11:49 AM2020-08-17T11:49:14+5:302020-08-17T12:05:12+5:30
राज्य व जिल्हा आरोग्य विभागाच्या अहवालामध्ये पुण्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठी तफावत
पुणे : राज्य आरोग्य विभाग आणि जिल्हा आरोग्य विभागाच्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारी मधील घोळ अजूनही सुरूच आहे. या घोळामुळे सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्णापाठोपाठ आता बाधितांची संख्याही राज्यात सर्वाधिक झाली. रविवारी राज्याच्या अहवालानुसार पुणे जिल्ह्याने मुंबईला मागे टाकत 1 लाख 30 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. मात्र, जिल्हा आरोग्य विभागाच्या अहवालानुसार अजूनही पुणे मुंबईपेक्षा मागेच आहे. पुणे जिल्हा आरोग्य विभागाचा रविवारचा आकडा 1,25,197 हा आकडा आहे. त्यामुळे आता 'दादा, पालक म्हणून तरी यंत्रणेला जागे करा, आकड्यांचा घोळ थांबवा', असे म्हणण्याची वेळ आली आहे.
राज्य व जिल्हा आरोग्य विभागाच्या अहवालामध्ये पुण्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत आजही मोठी तफावत आढळून येत आहे. ही बाब लोकमत ने उजेडात आणल्यानंतर यंत्रणेला जाग आली. खुद्द मुख्यमंत्र्यांनी आकड्यांचा घोळ सुधारण्याची सूचना केली. जिल्ह्याची 'स्मार्ट' यंत्रणा उघडी पडल्याने बदल करण्यास सुरुवात झाली. कोविड केअर सेंटर वर घरी सोडण्यात येणाऱ्या रुग्णांची माहिती भरली जात नसल्याचे लक्षात आले. पण हे बदल काही दिवसांचेच ठरले. आज पुन्हा जैसे थे स्थिती झाली आहे. आता एकूण बाधित रुग्णांमध्येही पुणे राज्यात सर्वात पुढे गेल्याने पुन्हा प्रश्न निर्माण झाले आहेत.
राज्याचा अहवालानुसार, रविवारी पुण्यात सुमारे 1 लाख 30 हजार रुग्ण झाले. तर मुंबई मध्ये सुमारे 1 लाख 28 हजार एवढे रुग्ण आहेत. पुण्याने ठाणे जिल्ह्याला यापूर्वीच मागे टाकले आहे. आता मुंबई ही मागे पडली आहे. त्यामुळे देशपातळीवर पुण्याकडे आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हॉटस्पॉट म्हणून बघितले जाणार आहे. वास्तविक जिल्हा आरोग्य विभागाकडील आकडेवारी नुसार पुणे अजूनही सुमारे 3 हजाराने मुंबईच्या मागे आहे. राज्य व जिल्ह्याच्या आकडेवारीत सुमारे 5 हजाराची तफावत आहे. सध्याचा पुण्यातील रुग्णवाढीचा वेग मुंबईपेक्षा अधिक असल्याने पुणे लवकरच मुंबईला मागे टाकेल, अशी स्थिती आहे. पण त्यापूर्वीच आकड्यांच्या घोळाने पुणे उभे गेले आहे.
----------------------------------
राज्य आरोग्य विभाग अहवालानुसार
एकूण बाधित अॅक्टिव्ह
पुणे- 1,30,606 41,020
मुंबई- 1,28,726 17,825
ठाणे। 1,13,944 20,288
---------------------------------------------
लोकमत चे प्रश्न -
राज्य अहवालातून ऍक्टिव्ह रुग्ण अचानक कमी झाले. ही चपळाई कुणाला दाखविण्यासाठी होती का? -
ऍक्टिव्ह रुग्णांमधील तफावत पुन्हा जैसे थे झाली आहे. यंत्रणा पुन्हा कोलमडली आहे का?
- बाधित रुग्णांचा आकडा राज्य अहवालात अधिक कसा? -
- यंत्रणेकडून योग्य माहिती का दिली जात नाही?
----------