पुणे पिंपरी शहराबरोबरच जिल्ह्यात सात दिवसांसाठी कडक निर्बंध लादत हॉटेल, रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून आजचा दिवस हा हॉटेल, रेस्टॉरंट व्यवसायिकांसाठी ‘काळा दिवस’ आहे, असे सांगत युनायटेड हॉस्पिटॅलिटी असोसिएशन या रेस्टॉरंट असोसिएशनने या निर्बंधांना विरोध करीत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
याविषयी बोलताना असोसिएशनचे उपाध्यक्ष अजिंक्य शिंदे म्हणाले, “मागील वर्षभरात लॉकडाऊनचा परिणाम म्हणून शहरातील ४० % रेस्टॉरंट बंद झाली आहेत. जी सुरु आहेत त्यांचा ५०% सुद्धा व्यवसाय होत नाहीये. अशा परिस्थितीत आणखी ७ दिवस हॉटेल व रेस्टॉरंट पूर्ण बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय हा जाचक आहे. हॉटेल, रेस्टॉरंट चालकांना आज भाडे भरण्याची देखील अडचण असून व्यवसाय करायचा कसा हा प्रश्न त्यांच्या समोर आहे. अशी परिस्थिती असताना आजच्या बैठकीत लागलेल्या निर्बंधांमुळे आम्ही हवालदिल झालो आहोत. इतर व्यापार, भाजीमंडई, दुकाने सुरु असताना हॉटेल व रेस्टॉरंट पूर्णपणे बंद ठेवणे म्हणजे आमच्या क्षेत्रावर अन्याय करण्यासारखे आहे.”
कोरोनाची वर्षभरातील परिस्थितीवर लागलेल्या लॉकडाऊनमुळे हॉटेल व रेस्टॉरंट क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. लॉकडाऊन संपला तरी आमच्यावर लागलेले निर्बंध मात्र कायम राहिले इतकेच नाही तर ते अधिक कडक होत गेले. आम्हीही गेले वर्षभर तोटा सहन करीत काम करीत राहिलो. आता मात्र या क्षेत्राला टिकून राहणे देखील शक्य नाही. सरकारने घालून दिलेल्या प्रत्येक नियमांचे आम्ही काटेकोरपणे पालन करण्यास तयार असून आम्हालाही व्यवसाय करायची संधी द्यावी, अशी मागणी या वेळी असोसिएशनचे सचिव दर्शन रावल यांनी केली.