पुणे : पुण्यातील उपचाराधिन कोरोनाबाधितांची संख्या मुंबई, ठाण्यापेक्षा कमी आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारकडूनच चुकीची माहिती प्रसारित केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे राज्यातील सर्वात मोठे कोरोना हॉटस्पॉट बनल्याची चुकीची चर्चाही त्यामुळे सुरू झाली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्य नियंत्रण कक्षातर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांतील कोरोनाबाबतची माहिती दिली जाते. राज्य सरकारही हीच माहिती अधिकृत मानते. मात्र, काही दिवसांपासून पुणे जिल्ह्याबाबत चुकीची माहिती दिली जात आहे. मंगळवारी तर पुणे जिल्ह्यातील उपचाराधिन (अॅक्टीव्ह) रुग्णांची संख्या ३६,८१० इतकी दाखविली होती. ठाणे आणि मुंबईपेक्षा हा आकडा जास्त असल्याने पुण्यात राज्यात सर्वाधिक रुग्ण असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, प्रत्यक्षात पुण्यामध्ये १९ हजारांच्याच आसपास रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे केंद्र सरकारकडेही पुण्याबाबत हिच चुकीची माहिती गेली आहे.
कोविड पोर्टलच्या अॅपमध्ये प्रत्येक फॅसीलिटी सेंटरने ही माहिती भरणे अपेक्षित आहे. परंतु, पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रातून ही माहिती व्यवस्थित भरली गेली नसल्याचे दिसत असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाºयांनी सांगितले. मंगळवारी रात्रीपर्यंत पुणे शहरात १५,४३४, पिंपरी-चिंचवड शहरात ३,७७६ तर ग्रामीण भागात २२३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्याचा दररोजचा कोरोना रुग्णांचा अहवाल कोविड इंडिया या केंद्र सरकारच्या पोर्टलवरील माहितीनुसार तयार केला जातो. त्यावरील माहिती जिल्हा आरोग्य विभागातून भरली जाते. पुण्याची आकडेवारी अद्ययावत केलेली दिसत नाही. याबाबत दोन दिवसांपूर्वी सांगण्यात आले आहे. - डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी, महाराष्ट्र