पुणे : महापालिकेकडून कोरोना रुग्नांसंदर्भातील दैनंदिन आकडेवारी दिली जात नसल्यामुळे गोंधळ उडाला असून देशभरात पुण्याची नाहक बदनामी झाली. हा प्रकार गंभीर असून ही फक्त कार्यालयीन चूक नसून ठरवून केलेला प्रकार आहे. यामागे आर्थिक हितसंबंध दडलेले असल्याच आरोप विरोधी पक्षांकडून केला जाऊ लागला आहे. एकूणच पालिकेतील सत्ताधारी भाजपासुद्धा प्रशासनावर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे.कोरोनाचे दैनंदिन 'अपडेट' न देण्यात विभागीय आयुक्त कार्यालय, महापालिका, पिंपरी चिंचवड आणि जिल्हा प्रशासनामधील समन्वयाचा अभाव कारणीभूत ठरत असून त्यामुळे लोकांमध्ये विनाकारण भीती निर्माण होत आहे. अद्यापही सुधारणेला बराच वाव असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून त्रुटी दूर कराव्यात असा सूर सर्वपक्षीय नेत्यांच्या प्रतिक्रियांमधून व्यक्त होत आहे. यासोबतच हा विषय ऐरणीवर आणलयाबद्दल 'लोकमत'चे आभारही मानले आहेत.-------चारच दिवसांपूर्वी विभागीय आयुक्तांची भेट घेऊन माहिती आणि सर्व डाटा अपडेट ठेवा असे सांगितले होते. तेव्हा त्यांनी पालिका ही माहिती अद्ययावत करीत नसल्याचे सांगितले होते. याबाबत पालिका आयुक्तांसोबत बोलल्यानंतर त्यांनी चार माणसांची नेमणूक करतो असे सांगितले होते. एकूणच पालिकेचा समन्वयाचा अभाव आहे. सर्व माहिती अपडेटेड ठेवण्याबाबत सूचना केल्या आहेत. वास्तविक पालिका आयुक्तांनी दररोजची कोरोनासंदर्भातील सर्व माहिती माध्यमांना दिली पाहिजे, जेणेकरून ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचेल.- गिरीश बापट, खासदारमहापालिकेकडून दररोज डॅशबोर्ड आणि कोविड अँपवर माहिती भरली जात आहे. जिल्हा प्रशासन आणि महापालिकेमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे आकड्यांची तफावत दिसते आहे. दोन्ही यंत्रणांमधील तफावत दूर करून समन्वय ठेवला जाईल. यापुढे नेमके आकडे दिले जातील आणि गोंधळ होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मी प्रशासनाला दिल्या आहेत. - मुरलीधर मोहोळ, महापौर-----कोरोनाच्या दैनंदिन आकडेवारी देण्यात काही अडचण असू नये. याबाबतचे वास्तव नेमके काय आहे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. कामात त्रुटी असतील तर त्याची दुरुस्ती करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात येतील. सध्या आरोग्य विभागाच आजारी असल्याची परिस्थिती आहे.- हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती, पुणे महापालिका-----कोरोनासंदर्भात चुकीची अथवा अपूर्ण माहिती देणे योग्य नाही. घडल्या प्रकाराबाबत सर्वंकष माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना करून उपाययोजना करण्यावर भर देण्यात येईल. सुधारणा करण्यावर पदाधिकारीही भर देतील.- धीरज घाटे, सभागृह नेते, पुणे महापालिका-----महापालिकेने दैनंदिन अपडेट हे नेमकेपणाने दिलेच पाहिजेत. चुकीच्या माहितीमुळे लोकांमध्ये भीती निर्माण होऊ शकते. 'लोकमत'ने यावर प्रकाश टाकल्याने हा विषय समजला. प्रशासनाने याबाबत तरी हलगर्जीपणा करू नये. याबाबत आयुक्तांची भेट घेऊन त्यांनाही आकडेवारीमुळे भीती पसरणार नाही याची खबरदारी घेण्याची मागणी करू. प्रशासनाने त्यांचे काम चोख करावे. प्रशासनावर अंकुश ठेवण्याच्या सत्ताधारी कमी पडत आहेत. विरोधी पक्ष म्हणून आम्हीही यापुढे लक्ष ठेवू. - दीपाली धुमाळ, विरोधी पक्षनेत्या, पुणे महापालिका-----पालिकेचा आणि जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त कार्यालयाचा समन्वय नाही. कामात अनेक त्रुटी आहेत. आयुक्तांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन अनेकदा त्रुटी निदर्शनास आणून देऊनही सुधारणा होत नाही. डाटा फिडींगसह खासगी रुग्णालयातील रुग्णांच्या मॉनिटरिंगवरही लक्ष नाही. अर्धवट आणि अपडेटेड माहिती न देण्याला प्रशासकीय कारभार जबाबदार आहे. याबद्दल जबाबदारी निश्चित करून कामात सुधारणा व्हावी. केवळ कागदी घोडे नाचवू नयेत.- पृथ्वीराज सुतार, गटनेते, शिवसेना------प्रशासनाने गांभीर्याने काम करण्याची आवश्यकता आहे. अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या निश्चित करून देणे आणि ते काम चोख होतेय की नाही हे आयुक्तांनी पाहावे. कोरोनासारख्या संवेदनशील विषयात असा हलगर्जीपणा योग्य नव्हे.- आबा बागुल, गटनेते, काँग्रेस-----आम्ही एक महिन्यापूर्वी आयुक्तांची भेट घेऊन आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या होत्या. डॅशबोर्डवर माहिती अद्ययावत नसते. अद्ययावत माहिती ठेवायलाच हवी. केवळ शासनालाच नव्हे तर नागरिकांनाही दैनंदिन अपडेटेड माहिती मिळणे आवश्यक आहे. काही अधिकारी मनमानी पद्धतीने काम करीत असल्याने चुकीची माहिती शासनाला मिळते.- रमेश बागवे, अध्यक्ष, शहर काँग्रेस कमिटी-----'लोकमत'ने हा प्रकार उघडकीस आणला म्हणून ही तफावत उजेडात आली. सत्ताधारी भाजपचे लक्ष नाही. प्रशासनावर अंकुश नाही. प्रशासन राज्य सरकारच्या अखत्यारीत काम करते असे सांगून हात वर केले जात आहेत. आरोग्य प्रमुखांना जबाबदारीचे भान नाही. एकूणच नियोजन आणि समन्वयाचा अभाव आहे. स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करून माहिती अपडेट ठेवणे आवश्यक आहे.- संजय मोरे, शहरप्रमुख, शिवसेना-----कोरोनाच्या उपचार, उपाययोजना आणि सुविधांबाबत पालिका अपयशी ठरली आहे. आकडेवारीत असलेला घोळ ही गंभीर बाब आहे. ही फक्त कार्यालयीन चूक नसून ठरवून केलेला प्रकार असण्याची शक्यता आहे. आधी पार्श्वभूमी तयार करायची आणि मग आर्थिक हितसंबंध जोपासण्याचे काम पालिकेत वर्षानुवर्षे होत आलेले आहे. पालिकेने आजवर केलेल्या खर्चात पर्यायी व्यवस्था उभी राहणे आवश्यक होते. अधिकारी व सत्ताधारी गंभीर नसल्याचे हे उत्तम उदाहरण आहे. - अजय शिंदे, शहरप्रमुख, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
आकडेवारी न भरण्यामागे (बातमी) जोडपालिका प्रशासनाचा सर्वच बाबतीत हलगर्जीपणा सुरू आहे. ज्या गोष्टी व्हायला हव्या होत्या त्या होत नव्हते. नगरसेवकांना कामात सहभागी करून घेण्यात दिरंगाई झाली. अनेकदा बैठकांमध्ये आणि वैयक्तिक स्वरुपात त्रुटी मांडूनही त्यामध्ये सुधारणा झाली नाही. आदेश आणि सुविधा या पालिकेतील काही अधिकाऱ्यांनी स्व-केंद्रित करून ठेवल्या आहेत. त्याचे विकेंद्रीकरण आवश्यक आहे. वाढलेली रुग्णसंख्या चिंतेचा विषय आहेच. त्यात आता खरी माहिती दिली जात नसेल आणि अपडेटेड डाटा माहिती पुरविली जात नसेल तर हा प्रकार गंभीर आहे.
- ऍड. वंदना चव्हाण, खासदार
------
पालिका प्रशासन पूर्ण क्षमतेने लढत आहे. परंतु, त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणेही आवश्यक आहे. चूका राहू नयेत, पुण्याबद्दलचा 'मेसेज' चांगला जावा याकरिता गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. स्मार्ट सिटी म्हणून निवड झालेल्या आकडेवारीत झालेली गफलत योग्य नव्हे. यामध्ये सुधारणा आवश्यक असून पंतप्रधानांनी घोषित केलेल्या या स्मार्ट सिटीला बट्टा लावणे योग्य नाही.
- चेतन तुपे, आमदार तथा शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस