Corona Virus Pune : पुणे जिल्ह्यातील बारामती, जुन्नर तालुक्यात सर्वाधिक कोरोना हॉटस्पॉट गावे व क्रियाशील रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 08:20 PM2021-09-04T20:20:54+5:302021-09-04T20:21:14+5:30
पुणे जिल्ह्यात कोरोनाचा धोका अद्यापही कमी झालेला नाही.
पुणे : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने बहुतेक सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. परंतु पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने ग्रामीण क्षेत्रात अद्याप अपेक्षित प्रमाणात कोरोनाचा धोका कमी झाला नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात आजही दररोज साडे तीनशेपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. यामध्ये जिल्ह्यात बारामती, जुन्नर तालुक्यात सर्वाधिक हॉटस्पॉट गावे व क्रियाशील रुग्ण आहेत. यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दी केली व नियमांचे उल्लंघन केल्यास तिस-या लाटेला लवकरच निमंत्रण देऊ, असा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आणि क्रियाशील रुग्ण बारामती आणि जुन्नर तालुक्यात आहेत. तर जिल्ह्यात आजही 91 गावे कोरोनाची हॉटस्पॉट गावे आहेत. जिल्ह्यात जुन्नर, आंबेगाव आणि दौंड या तालुक्यात सर्वाधिक हॉटस्पॉट गावांचा समावेश आहे. तर कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वाधिक हॉटस्पॉट गावे असलेल्या खेड आणि मावळ व भोर आणि वेल्हा आज एक ही गाव हॉटस्पॉटमध्ये नाही.
जिल्ह्यात बारामती तालुक्यात तब्बल 940 क्रियाशील रुग्ण असून 680 कोरोना बाधित रुग्ण आहेत. तर जुन्नर तालुक्यात 523 कोरोना बाधित रुग्ण व क्रियाशील रुग्णांची संख्या 751 च्या घरात गेली आहे. तर आंबेगाव तालुक्यातील घोडेगावच्या हद्दीत सर्वाधिक ६६ क्रियाशील कोरोना रुग्ण आहेत. घोडेगावपाठोपाठ याच तालुक्यातील मंचर येथे ५७ तर, जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे ५४ क्रियाशील कोरोना रुग्ण असल्याचे दिसून आले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातून हे उघड झाले आहे. जिल्ह्यातील एकूण हॉटस्पॉट गावांपैकी सर्वाधिक २५ गावे ही जुन्नर तालुक्यातील आहेत. जुन्नरपाठोपाठ बारामती तालुक्यातील १५, इंदापूर आणि आंबेगाव तालुक्यातील प्रत्येकी बारा आणि दौंड तालुक्यातील दहा गावांचा समावेश आहे.
----
जिल्ह्यात सर्वाधिक हॉटस्पॉट तालुके व गावांची संख्या
जुन्नर 25, बारामती 15, इंदापूर 12, आंबेगाव 12, दौंड 10, शिरूर 7, हवेली 6 पुरंदर 3, मुळशी 1 , एकूण 91