पुणे : शहरातील वाढती कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आणि खाटांची कमतरता यामुळे पालिकेने काही रुग्णालयांमधील खाटा ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. नव्याने इनलॅक्स बुधरानी, सह्याद्री-हडपसर, नोबल रुग्णालय, भारती हॉस्पिटल-कात्रज, पुना हॉस्पिटल या पाच रुग्णालयातील खाटा नियंत्रित करण्यात आल्या आहेत. याठिकाणी पालिकेकडूनच रुग्ण पाठविण्यात येणार आहेत. पालिकेकडून याला ‘खाटा नियंत्रित’ केल्या असे गोंडस नाव देण्यात येत असले तरी प्रत्यक्षात या खाटांचे नियोजन पालिकेकडे असणार आहे.
पुणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा फुगत चालला आहे. आॅक्सिजन, आयसीयू आणि व्हेंटीलेटरच्या खाटा उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. खाटा कमी आणि रुग्ण अधिक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही रुग्णालयांकडून त्यांच्याकडील उपलब्ध खाटांची माहिती डॅशबोर्डवर अपडेट केली जात नसल्याने खाटा अडवून ठेवल्याच्या तक्रारी येत आहेत. पालिकेकडून या रुग्णालयांना वारंवार सूचना देऊनही गांभिर्याने घेतले जात नसल्याचे दिसते आहे. पालिकेने यापुर्वीच काही रुग्णालयांमधील खाटा नियंत्रित केल्या आहेत.
प्रशासनाने शुक्रवारी इनलॅक्स बुधरानी, सह्याद्री-हडपसर, नोबल रुग्णालय, भारती हॉस्पिटल-कात्रज, पुना हॉस्पिटल या पाच रुग्णालयातील खाटा नियंत्रित करण्याच आदेश काढला आहे. या रुग्णालयातील खाटांचे नियंत्रण पालिकेच्या कोविड नियंत्रण कक्षाकडून केले जाणार आहे. रुग्णांना आवश्यकतेनुसार, या खाटा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. जे नागरिक महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये पात्र आहेत अशांच्या उपचारांचा रुग्णालयाचा खर्च पालिका देणार आहे. तर, जे नागरिक या योजनेमध्ये पात्र नाहीत त्यांचा खर्च नागरिकांना स्वत:च करावा लागणार आहे. शासनाच्या निकषांनुसारच उपचारांच्या खर्चाचे नियम पाळले जाणार असल्याचे अतिरीक्त आयुक्त शांतनू गोयल यांनी सांगितले.