पुणे : कोविड-१९ च्या रूग्णांवर उपचार करताना, अव्वाच्या सव्वा बिले आकारून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या शहरातील खाजगी हॉस्पिटलवरपुणे महापालिकेने कारवाईचा बडगा उगरला आहे.दीड लाखांपेक्षा जास्त बिल आकारले गेल्यास व संबंधित रूग्णांनी तक्रार केल्यास त्याची शहानिशा पुणे महापालिकेकडून करण्यात येत असून, आजपर्यंत या तपासणीत तब्बल ८८ लाख ७६ हजार ५७६ रूपयांची बिलांची रक्कम कमी करण्यात आली आहे.
पुणे महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.मनिषा नाईक यांनी याबाबत माहिती दिली. कोविड-१९ च्या रूग्णांवर उपचार करताना दीड लाखापेक्षा अधिक बिल आकारणी केल्याप्रकरणी, सदर बिलांची शहानिशा करण्याबाबत १४ आॅगस्ट पासून ९ सप्टेंबर पर्यंत ३११ तक्रारी महापालिकेकडे दाखल झाल्या होत्या. या ३११ तक्रारींपैकी १८६ तक्रारींमध्ये खासगी हॉस्पिटलकडून तब्बल ५ कोटी ४५ लाख ९८५ इतकी मूळ बिलाची रक्कम आकारण्यात आली होती. या सर्व बिलांची पुणे महापालिकेच्या डॉक्टर व आॅडिटरच्या टिमकडून तपासणी करण्यात आली असता, यापैकी ८८ लाख ७६ हजार ५७६ रूपये कमी करण्यात आले आहेत.
खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करताना संबंधित हॉस्पिटलकडून पीपीई किट, औषध खरेदी, बेड चार्जेस, डॉक्टरांची फी आदी बिले लावली जातात. यामध्ये काय उपचार केले त्याचा खर्चही वेगळा असतो. कोरोना आपत्तीत सद्यस्थितीला अनेक रूग्णांची खाजगी हॉस्पिटलकडून पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी वारंवार प्रशासनाकडे येत होत्या. या पार्श्वभूमीवर महापालिकेने स्वत:ची एक डॉक्टर व आॅडिटरची टीम तयार करून, खासगी हॉस्पिटलच्या मनमानी कारभारावर चाप आणला. हॉस्पिटलने दिलेले बिल वस्तुस्थितीला धरून आहे का याची शहानिशा सुरू केली व आज लाखो रूपयांची बिले कमी करून नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.
------
बिलात संशय आला तर तक्रार करण्याचे आवाहन
खासगी हॉस्पिटलमध्ये कोविड-१९ वर उपचार करताना जर दीड लाखाच्या वर बिल आकारले गेले व या बिलात संशय वाटल्यास संबंधित रूग्णांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी महापालिकेकडे तक्रार करावी, असे आवाहनही महापालिकेने केले आहे.
------------------------