पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात येणाऱ्या जंबो रुग्णालयासाठी पालिकेच्या वाट्याला येणारा खर्च पालिका उचलणार असून त्यामध्ये हयगय केली जाणार नाही. पुणेकरांसाठी आरोग्य सुविधांनी युक्त असे एक हजार खाटांचे रुग्णालय लवकरच उभारण्यात येणार असून या रुग्णालयाला स्व. नानाजी देशमुख यांचे नाव देण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.
महापालिकेच्या अंदाजपत्रकात रुग्णालयासाठी तरतूद करण्यात आली असून राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेकडून कर्जस्वरुपात निधी उपलब्ध घेतला जाणार आहे. मागील ४ महिन्यांपासून पालिकेकडून कोरोना नियंत्रणासाठी अहोरात्र काम केले जात असून आत्तापर्यंत २५० ते ३०० कोटींचा खर्च झाला आहे. पुण्यामध्ये ऑगस्ट महिन्यात कोरोनाग्रस्त रूग्णांचा आकडा २ लाखांच्या वर जाण्याची शक्यता आहे. त्याचवेळी गंभीर कोरोनाग्रस्त रूग्णांना खासगी तसेच शासकीय रूग्णालयात ऑक्सिजनची सुविधा असलेले बेड उपलब्ध होत नाही. जंबो हॉस्पीटल हे पुणेकरांसाठीच असल्याने त्यासाठी महापालिका सर्वतोपरी सहकार्य करणार असून आवश्यक निधी स्थायी समितीच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याचे रासने म्हणाले.
कोरोनाची ही साथ आटोक्यात येईपर्यंत आणखी खर्च करावा लागणार आहे. त्यातच, लॉकडाऊनमुळे महापालिकेचे उत्पन्नही घटलेले आहे. शहरातील कोरोना नियंत्रनचा कोणताही खर्च पालिकेने थांबविलेला नाही तसेच थांबवणारही नाही. मात्र, महापालिकेची आर्थिक स्थिती आणि कोरोना नियंत्रणाचे काम पाहता राज्य शासनाने आर्थिक सहाय्य करण्याची आवश्यकता असल्याचे रासने म्हणाले.