पुणे : पुणे शहराने कोरोना लढाईतील महत्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. पुणे शहरात १ जूनपर्यंत २५ लाख २ हजार ७०१ नागरिकांनी कोरोना तपासणी केली आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
पुणे शहरात मागच्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. यानंतर पहिल्या लाटेत शहरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसाला दोन हजार तर दुसऱ्या लाटेत ही ४ ते ५ हजारांच्या आसपास होती. मात्र गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत असून सोमवारी तर फक्त १८० रुग्ण आढळून आले होते. तसेच कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
बुधवार (दि.२ जून) पर्यंत शहरात २५ लाख १० हजार १८४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७० हजार ७७८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.तर यापैकी ४ लाख ५७ हजार १६० जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत शहरात ८ हजार ३१३ जणांचा मृत्यू झाला आहे़
पुणे शहरात ३१ मे पर्यंत १० लाख ५५ हजार ५०६ जणांचे लसीकरण पूर्ण
कोरोना प्रतिबंधक लसीकरणात पुणे शहराने २० मे नंतर मोठी आघाडी घेतली असून, यात खासगी रूग्णालयांमध्ये होणारे लसीकरणाचा मोठा हातभार लागला आहे. यामुळे शहरात ३१ मे पर्यंत १० लाख ५५ हजार ५०६ जणांचे लसीकरण झाले आहे. यात २ लाख ५७ हजार ३०८ जणांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाले आहेत. तर ७ लाख ९८ हजार १९८ जणांना लसीचा अद्याप दुसरा डोस मिळण्याची प्रतिक्षा आहे.