पुणे : राज्याच्या तुलनेत गेले दोन दिवस पुणे जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा बऱ्यापैकी पुरवठा होत असताना बुधवारी सायंकाळपर्यंत मात्र पुण्यासाठी एकही रेमडेसिविर इंजेक्शन पुरवठा झाला नाही. मागणीच्या तुलनेत पुरवठा खूपच कमी होत असल्याने व अनेक हाॅस्पिटलकडून तुमच्या पेशंटला दोन तासात रेमडेसिविर उपलब्ध करून द्या अन्यथा आम्ही जबाबदारी घेणार नाही असे वारंवार सांगितले जात असल्याने बुधवारी दिवसभर रेमडेसिविर इंजेक्शन मिळविण्यासाठी पेशंटच्या नातेवाईकांना प्रचंड वणवण करावी लागली.
दरम्यान पुण्यासाठी रेमडेसिविर उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा प्रशासन सतत प्रयत्नशील असून, रात्री उशीरापर्यंत दिल्ली येथून थेट विशेष फ्लाईटने काही प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा पुण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी दिली. पुणे शहर आणि जिल्ह्यात सोमवार,मंगळवार या दोन दिवसांत १२ हजार ७९७ रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला. परंतु, दररोज रुग्णसंख्या वाढतच असल्याने रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी देखील वाढतच आहे. सध्या अनेक खासगी हाॅस्पिटलकडून गरजेपेक्षा अधिक रेमडेसिविर इंजेक्शन वापर अधिक केला जात असून, यावर जिल्हा प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे.-----हाॅस्पिटलकडून पेशंटच्या जीवाशी खेळ कोरोनामध्ये रेमडेसिविर इंजेक्शन मिळाले नाही म्हणून आता पर्यंत एकाही रुग्णांचा मृत्यु झाला नाही, पण रुग्णाची परिस्थिती गंभीर आहे काही करून दोन तरी रेमडेसिविर इंजेक्शन तातडीने उपलब्ध करून द्या, अन्यथा तुमच्या पेशंटची जबाबदारी आम्ही घेणार नाही, असे सांगून सध्या काही हाॅस्पिटल पेशंटच्या जिवाशी खेळत आहेत. तसेच काही हाॅस्पिटलकडून गरजेपेक्षा अधिक प्रमाणात पेशंटला रेमडेसिविर इंजेक्शनचा डोस दिला जात असल्याचे भरारी पथकातील एका अधिका-यांनी सांगितले.