Corona virus : बारामतीतील ८ हजार १४९ व्यक्तींचा क्वारंटाईन पूर्ण; संभाव्य धोका टळला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 03:39 PM2020-04-13T15:39:53+5:302020-04-13T15:40:24+5:30
बारामतीमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू
बारामती : शहर व तालुक्यातील ९२ विदेशातून आलेल्या व बाहेरगावातून ८ हजार १४९ व्यक्तींचा १४ दिवसांचा क्वारंटाईन पूर्ण झाला आहे. त्यांच्यापासून होणारा संभाव्य धोका टळला आहे अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.
बारामतीमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून ५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापार्श्वभूमीवर शहरात खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचनेनुसार शहरातील ४४ प्रभागातील नागरिकांना घरपोच सर्व सुविधा नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. नागरिकांनी अजिबात घराबाहेर पडू नये यासाठी भिलवाडा पॅटर्नच्या धर्तीवर प्रशासन काम करीत आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिलेल्या माहितीनुसार बारामती शहर व तालुक्यात १० हजार २८२ नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी ८ हजार १४९ नागरिकांचा १४ दिवसांचा कोरोनंटाईन पूर्ण झाला आहे. त्यामुळे या नागरिकांकडून होणारा संभाव्य धोका टळल्याने प्रशासनाने देखील सुटकेचा निश्वास सोडला आहे. त्याच बरोबर परदेशातून आलेल्या ९२ नागरिकांचा देखील क्वारंटाईन पूर्ण झाला आहे. सध्या परदेशातून आलेले हे ९२ नागरिक पॅसिव्ह क्वारंटाईनमध्ये आहेत.
शहरात केलेल्या उपाययोजनांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरातील प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे सुरू आहे. समर्थनगर येथील रुग्णाच्या संपर्कातील आणखी तीन व्यक्तींचे नमुने चाचणीसाठी नायडू हॉस्पिटलला पाठवण्यात आले आहेत.
- योगेश कडूसकर,मुख्याधिकारी, बारामती नगरपालिका
---------------------------------------------------