नीलेश राऊत- पुणे : शासनाच्या सुचनेनुसार लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असलेले कोरोना पॉझिटिव्ह (कोविड -१९) रूग्ण घरी सोडण्यास पुणे महापालिकेने सुरूवात केली आहे. परंतु, असे 'होम आय सोलेशन (घरी राहून उपचार) साठी पाठविलेले रूग्ण घराबाहेर फिरत राहिल्यास त्यांच्यापासून इतरांना कोरोना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे 'होम आयसोलेशन' साठी पाठविलेले रूग्ण घराबाहेर पडल्यास तात्काळ महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयाशी अथवा पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त कोरोनाच्या तपासण्या करून, कोरोनाबाधितांना इतरांपासून विलग करून त्यांच्यावर लागलीच उपचारासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. याचबरोबर वाढती रूग्ण संख्या व रूग्णालयांतील अथवा आयसोलेशन सेंटरमधील खाटांची उपलब्ध संख्येची मर्यादा लक्षात धेता, शासनाच्या सुचनेनुसार लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असलेले कोरोना पॉझिटिव्ह (कोविड -१९) रूग्ण घरी सोडण्यास महापालिकेने सुरूवात केली आहे. रविवारपर्यंत साधारणत: ५२५ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण घरी पाठविण्यात आले असून, 'टेली मेडिसीन' व्दारे त्यांच्यावर उपचार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातील तीन डॉक्टर सध्या होम आयसोलेशेन केलेल्या रूग्णांशी संपर्क साधून त्यांच्यावरील उपचारांवर लक्ष ठेऊन आहेत. दिवसातून तीन वेळा प्रत्येक रूग्णास फोन करून तसेच काही ठिकाणी व्हिडिओ कॉल करून त्यांच्या प्रकृतीची नोंद ठेवली जात आहे. जर कोणा रूग्णाची लक्षणे तीव्र झाल्यास त्यास आवश्यकता भासल्यास रूग्णालयांत दाखल करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, अद्याप तरी 'होम आयसोलेशन' केलेल्या एकाही रूग्णास रूग्णालयात हलविण्याची अद्याप तरी वेळ आलेली नाही. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.संजीव वावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, होम आयसोलेशेन केलेल्या एकूण रूग्णांपैकी ९५ टक्के रूग्णांना फोनवरून नित्याने मार्गदर्शन केले जात आहे. ज्यांचे फोन लागत नाही अथवा उचलत नाहीत अशा रूग्णांशी क्षेत्रिय कार्यालय स्तरावरून कर्मचारी पाठवून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. --------------------------------------कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांना वाळीत टाकू नका शासनाने विचार करूनच सौम्य लक्षणे व लक्षणे नसलेल्या रूग्णांना घरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आहे म्हणून त्याला वाळीत टाकू नका, असे कोणी केले तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. जे नागरिक पॉझिटिव्ह रूग्णांना वाळीत टाकत आहेत. उद्या त्यांच्याच घरातील एखादा व्यक्ती पॉझिटिव्ह आला तर दुसऱ्यांनी अशीच भूमिका घेतली तर त्यावेळी तुम्ही काय करणार. त्यामुळे घाबरू नका पण काळजी घ्या, कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांना वाळीत टाकू नका.---------------तुम्ही प्रतिज्ञापत्रावर सही केली आहे खोली सोडू नका़ होम आयसोलेशेनसाठी घरी पाठविताना संबंधित रूग्णांनी प्रतिज्ञापत्र लिहून देत आहेत़ यात त्यांनी सही करताना 'मी उपचार कालावधी पूर्ण होईपर्यंत घर काय पण माझी खोली ही सोडून जाणार नाही, असे लिहून दिले असून, संपूर्ण खबरदारी मी घेईन व काही लक्षणे दिसली तर तातडीने महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला कळवेल असे कबुल केले आहे. त्यामुळे संबंधित रूग्ण राहत असलेल्या सोसायटीतील अथवा आसपासच्या नागरिकांना तो रूग्ण बाहेर पडलेला दिसला तर त्यांनी तातडीने पालिकेच्या आरोग्य यंत्रणेला अथवा पोलीसांना कळवावे़,जेणे करून बाहेर फिरणाऱ्या रूग्णाची रवानगी लागलीच पालिकेच्या आयसोलेशन सेंटरमध्ये करण्यात येईल.