Corona virus : रिपोर्ट ' पॉझिटिव्ह ' आलाय, तुम्हीच करा तुमची सोय, पुण्यातील खासगी लॅबमधील भेदक वास्तव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 11:33 IST2020-07-19T11:32:44+5:302020-07-19T11:33:26+5:30
रुग्णांनाच करावी लागतेय धावपळ

Corona virus : रिपोर्ट ' पॉझिटिव्ह ' आलाय, तुम्हीच करा तुमची सोय, पुण्यातील खासगी लॅबमधील भेदक वास्तव
पुणे : खासगी लॅबमध्ये कोविड टेस्टिंग केल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास रुग्णांनाच आपली सोय करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. खासगी लॅब व महापालिकेतील समन्वयाच्या अभावामुळे रुग्णांशी संपर्क साधून त्यांना विलगीकरण किंवा रुग्णालयात भरती करण्यामध्ये प्रशासनाची दमछाक होत असल्याचे चित्र आहे. फोन येण्याआधीच काही रुग्ण स्वत:हून दाखल होत आहेत. तर काहींना चौकशीचा फोनही येत नसल्याचा अनुभव येत आहे.
पुणे शहरामध्ये आठ शासकीय व १४ खासगी लॅबमध्ये कोविड नमुन्यांची तपासणी केली जात आहे. सध्या दररोज सहा हजारांहून अधिक नमुने तपासले जात आहेत. खासगी लॅबमध्येही दररोज शेकडो टेस्ट होत आहेत. लॅबकडून वेळेत रुग्णांची माहिती दिली जात नसल्याचे अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी गुरूवारीच स्पष्ट केले आहे. वेळेत रुग्णांची माहिती मिळत नसल्याने त्यांची बैठकही घेतली जाणार आहे. याचअनुषंगाने खासगी लॅब व महापालिकेतील समन्वयाचा अभाव असल्याचे काही घटनांवरून समोर आले आहे.
सिंहगड रस्त्यावरील एका सोसायटीमध्ये राहणाऱ्य महिलेने ताप येत असल्याने खासगी लॅबमध्ये तपासणी केली. त्यांना कोरोना असल्याचे निदान झाले. मग त्या स्वत: ओळखीच्या माध्यमातून खासगी रुग्णालयात दाखल झाल्या. त्यांना दुसºयादिवशी महापालिकेतून चौकशीचा फोन आला. पण रुग्णालयात दाखल झाल्याचे सांगितल्यानंतर फोन ठेवण्यात आला. त्यांच्या घरातील पती व मुलाने दुसºया दिवशी त्याच लॅबमध्ये टेस्ट केली. दोघांचीही टेस्ट पॉझिटिव्ह आली. दुसºया दिवशी त्यांनीही नवले व अन्य काही रुग्णालयांमध्ये चौकशी केली. मग शेजारील रहिवाशांनीच त्यांचे अहवाल सिंहगड कोविड सेंटरवर दाखवून औषधे आणली. तोपर्यंत महापालिकेकडून त्यांची विचारणा झाली नव्हती. तसेच रहिवाशांनी विनंती केल्यानंतर इमारतीमध्ये सॅनिटायझेशन करण्यात आल्याचे रहिवाशांनी सांगितले.
------------
दांडेकर पुलाजवळील एका ज्येष्ठ नागरिकानेही जवळच्या रुग्णालयात चाचणी केली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या मुलाने आता पुढे काय? असे रुग्णालयात विचारले. त्यांनी महापालिकेकडून दुरध्वनी येईल, असे सांगितले. दुसºया दिवशी सकाळपर्यंत त्यांनी दुरध्वनीची वाट बघितली. पण संपर्क साधण्यात न आल्याने मुलाने स्वत:हून हेल्पलाईनवर संपर्क साधत माहिती दिली. त्यानंतर त्यांना सिंहगड कोविड सेंटरला जायला सांगितले. तिथे मग होम आयसोलेशनचा फॉर्म भरण्यात आल्याची माहिती मुलाने दिली.
---------------------------
डॉक्टरच सांगतील...
काही खासगी लॅबमध्ये चौकशी केल्यानंतर ‘चिठ्ठी दिलेल्या डॉक्टरांकडूनच घरीच राहायचे की रुग्णालयात जायचे याबाबत सांगितले जाईल, आम्ही फक्त टेस्ट करून त्याची माहिती महापालिकेला कळवितो. त्यांच्याकडूनच फोन येईल’ अशी उत्तरे मिळाली.
-------------------
खासगी लॅबकडून ई-मेलद्वारे दररोज माहिती दिली जाते. त्यामध्ये रुग्णाचा मोबाईल क्रमांकही असतो. त्यावर रुग्णाशी संपर्क साधून बोलावून घेतले जाते. चिठ्ठी घेतलेल्या खासगी डॉक्टरांकडूनही रुग्णांना माहिती दिली जाते.
- संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका
-------------------