पुणे : ससून रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व परिचारिकांच्या राहण्याची व्यवस्था परिसरातील हॉटेलमध्ये केली जाणार आहे. पण काही हॉटेल चालकांनी हॉटेल देण्यास नकार दिला आहे. पण या हॉटेल जवळ असलेल्या सोसायट्यांमधील रहिवाशांनी तर माणुसकीच सोडून दिल्याचा अनुभव अधिकाऱ्यांना आला आहे. आमच्या शेजारील हॉटेलमध्ये डॉक्टरांच्या राहण्याची व्यवस्था नको, अशी विनवणीच अधिकाऱ्यांकडे केली आहे.जगभरात कोरोना विषाणुने थैमान घातले आहे. लोक एकमेकांच्या संपर्कात येऊ नयेत, म्हणून संपुर्ण भारतात लॉकडाऊन आहे. सगळीकडे भीतीचे वातावरण असताना डॉक्टर, परिचारिका तसेच अत्यावश्यक सेवेतील अनेक कर्मचारी आपल्या सेवेत कसूर न करता लोकांच्या मदतीसाठी धावपळ करत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर व परिचारिकांना तर कोरोनाची लागण होण्याचा सर्वाधिक धोका आहे. पण असे असतानाही या लढ्यात ते आपल्या जीवाची पर्वा न करता सहभागी झाले आहेत. त्यांच्या कुटूंबियांना संसर्ग होऊ नये म्हणून ससूनमधील डॉक्टर, परिचारिका व इतरांच्या राहण्याची व्यवस्था जवळच्या हॉटेल्समध्ये केली जात आहे. पण काही हॉटेल चालकांनी त्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे काही डॉक्टरांची व्यवस्था शासकीय विश्रामगृहात करण्यात आली आहे. पण ही जागा पुरेशी नसल्याने प्रशासनाला हॉटेल ताब्यात घ्यावीच लागणार आहेत. ही हॉटेल ताब्यात घेताना प्रशासनाला शेजारील रहिवाशांकडून वेगळाच अनुभव येत आहे.याविषयी बोलताना तहसिलदार तृप्ती कोलते म्हणाल्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेप्रमाणे ससून रुग्णालय परिसरातील हॉटेल चालकांना डॉक्टरांसाठी खोल्या देण्याबाबत विनंती करण्यात आली. काही हॉटेल चालकांनी त्यास नकार दिला आहे. पण या हॉटेल परिसरातील रहिवाशांनीही हॉटेलमध्ये डॉक्टर व परिचारिकांची राहण्याची व्यवस्था करण्यास विरोध केला. आमच्याशेजारी त्यांना ठेवू नका, असा पवित्रा त्यांनी घेतला. हे ऐकून आम्हीही अवाक झालो. सध्याच्या परिस्थितीत समाजाने असा दुषित दृष्टीकोन सोडून द्यायला हवा. डॉक्टर, परिचारिकांकडून सर्वतोपरी दक्षता घेतली जाते. त्यामुळे समाजानेही त्यांना साथ द्यायला हवी, असे आवाहन कोलते यांनी केले.
Corona virus : पुण्यात रहिवासी म्हणतायेत, डॉक्टर आमच्या शेजारी नको..!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 2:37 PM
सर्वाधिक धोका पत्करून डॉक्टर व पारिचारिका संशयित रुग्णांवर उपचार करत आहे..
ठळक मुद्देअधिकाऱ्यांकडे विनवणी : ससूनमधील डॉक्टरांना विरोध