पुणेः कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जीवावर उदार होऊन बंदोबस्तात काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी 'रिवार्ड' दिला जाणार आहे. यात ड्युटीवर असताना दुर्दैवाने संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला कोरोना झाल्यास त्याला दहा हजार रुपये रिवार्ड म्हणून दिले जाणार आहेत. या रिवार्डची रक्कम पोलिस कल्याण निधीतून त्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार असून आगाऊ रक्कम म्हणून एक लाख रुपये संबंधीत पोलिसांना बिगरव्याजी दिले जाणार आहे. अशी घोषणा सह पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी केली. आत्तापर्यंत शहर पोलिस दलात आठ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, त्या सर्वांना हा रिवार्ड देण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना डॉ. शिसवे यांनी सांगितले, कोरोना संकटाच्या काळात पोलिस लॉकडाऊनची अंमलबजावणी करत आहेत. कर्तव्य पार पाडताना पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनाबाधितांशी अनेकदा संपर्क येतो, यावेळी योग्य ती काळजी घेतली जाते आहे. मात्र तरी देखील दुर्दैवाने काही पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. .या कर्मचाऱ्यांना योग्य ते तत्काळ उपचार मिळावेत म्हणून शहरातील काही रुग्णालयात पोलिसांसाठी बेड आरक्षित करण्यात आले आहेत. यापुढे जर दुर्दैवाने एखाद्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली तर, एक कौटूंबाचा घटक म्हणून, एक पोलिसांची टीम कर्मचाऱ्याला स्क्रिनींगसाठी घेऊन जाईल व योग्य उपचार कसे मिळतील यावर लक्ष ठेवेल. सर्वात महत्वाचे धोरण हे आहे की, कर्तव्य पार पाडत असताना पोलिसांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, तो टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यात येत आहे.