पुणे: कोरोना आजाराचा शहरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर संसर्ग वाढत असून येरवडा विभागात कोरोनाचे ८५ हून अधिक रुग्ण आढळले असून गुरुवारी सकाळी एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. येरवड्यातील मृतांची संख्या आता चार झाली असून त्यामुळे येरवड्यातील धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. येरवड्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली असून नागरिक मात्र अजूनही गंभीर झालेले दिसत नाहीत. येरवड्यातील वाढत्या रुग्णांच्या संख्येबाबत प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत. येरवडा परिसरात दाट लोकवस्तीचा परिसर असून लक्ष्मीनगर सारख्या झोपडपट्टी भागात कोरोनाचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आहेत. आतापर्यंत चार लोकांनी या गंभीर आजारामुळे आपला जीव गमावला आहे. प्रशासनाकडून रुग्ण त्यांचे नातेवाईक तसेच संपकार्तील व्यक्ती यांच्यावर तपासणी उपचार या सर्व गोष्टी सुरू आहेत. आजाराचा संसर्ग वाढू नये यासाठी संचारबंदी लागू केली असताना देखील नागरिक अजूनही गंभीर झालेले दिसून येत नाहीत. या परिस्थितीत देखील नागरिक मोठ्या प्रमाणावर भाजी विक्री व इतर अनावश्यक गोष्टी करताना दिसून येत आहेत. स्थानिक पातळीवर नागरिक संचारबंदी काळातही घरात न थांबता अनावश्यकपणे रस्त्यावर येत आहेत. काही वस्त्या व सोसायट्यांमध्ये इतर परिसरातील नागरिक नातेवाईकांकडे लपून छपून वास्तव्य करत आहे. येरवड्यातील आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत. याबाबत वडगाव शेरी मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे म्हणाले, येरवडासह संपूर्ण शहराची परिस्थिती ही दिवसेंदिवस अतिशय गंभीर होत असून नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. आजाराचा संसर्ग वाढू नये म्हणून आजाराची कोणतीही लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका रुग्णालयात तपासणी करून घ्यावी. प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व तपासण्या व उपचार सुरू आहेत. घरीच थांबून अनावश्यक बाहेर न पडता सोशल डिस्टन्ससिंगचे काटेकोर पालन करत आपली व आपल्या कुटुंबाची तसेच परिसराची काळजी घ्यावी. येरवडा परिसरात वाढती रुग्ण संख्या ही अत्यंत गंभीर बाब असून नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन टिंगरे यांनी केले आहे.
Corona virus : पुण्यातील येरवडा परिसरात धोका वाढला; कोरोना बाधित महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 9:55 PM
येरवड्यातील मृतांची संख्या झाली आता चार
ठळक मुद्देकृपया घराबाहेर पडू नका प्रशासनाचे आवाहनयेरवड्यातील वाढत्या रुग्णांच्या संख्येबाबत प्रशासनाने सतर्कतेचे आदेश प्रशासनाकडून रुग्ण त्यांचे नातेवाईक तसेच संपकार्तील व्यक्ती यांच्यावर तपासणी उपचार सुरू