नीलेश राऊत-पुणे : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचे ऑनलाईन मयत पास मिळत असले तरी, संबंधित मयताचा मृत्यू दाखला हवा असल्यास मयताच्या नातेवाईकाने अथवा जेथे मृत्यू झाला आहे, त्या हॉस्पिटल प्रशासनाने सर्व कागदपत्रे तीही साक्षांकित करून प्रत्यक्ष सादर करावी. अन्यथा मृत्यू दाखला मिळणार नसल्याचे महापालिकेच्या जन्म-मृत्यू कार्यालयाच्या प्रमुख सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. डिजिटल इंडियाच्या प्रक्रियेत पुणे महापालिकेनेही एक पाऊल टाकत, काही महिन्यांपूर्वी नागरिकांना आता ऑनलाईन मृत्यू दाखले प्राप्त होतील, असे सांगत ऑनलाईन प्रक्रियेचा वापर केला तर नागरिकांचा मोठा त्रास वाचेल असा दावा केला होता. पण सद्यस्थितीलाही महापालिकेच्या ऑनलाईन प्रक्रियेतून केवळ कोविड-१९ मुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा मृत्यू पास मिळत आहे. हा पास घेऊन मयताचे नातेवाईक मृत्यू दाखला घेण्यासाठी जातात, तेव्हा आम्ही इतर कागदपत्रे ऑनलाईन सादर केली आहेत असे सांगून मृत्यू दाखल्याची मागणी करतात. तेव्हा मात्र वॉर्ड-ऑफिस तथा जन्म-मृत्यू कार्यालयांकडून केवळ मयतपासवर मृत्यू दाखला मिळणार नसल्याचे उत्तर मिळते. या पार्श्वभूमीवर डॉ़बळीवंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, वारस नोंद, वाटणीपत्र, शासकीय तसेच न्यायालयीन कामकाजात ऑनलाईन मृत्यू दाखला ग्राह्य नसल्याचे सांगून, या सर्व ठिकाणी महापालिकेच्या शिक्क्याचाच मृत्यू दाखला मागितला जात असल्याचे सांगितले. तसेच मृत्यू दाखल्यात काही हरकती आल्यास़ मृत्यू दाखल्याची शहानिशा करताना, कोण-कोणती कागदपत्रे व पुरावे दिले याचीही माहिती घेतली जाते. त्यामुळे हॉस्पिटलकडून अथवा मयताच्या नातेवाईकांनी सादर केलेले फॉर्म-४, नमुना-२, मयताचे आधारकार्ड व नातेवाईकांचे आधारकार्ड (ज्याने मृत्यूची माहिती दिली व कागदपत्रे सादर केली तो) ही कागदपत्रे भविष्यातही खूप महत्वाची ठरतात. परिणामी ऑनलाईन प्रक्रियेतील कागदपत्रे प्रत्यक्ष ती ही साक्षांकित करून सादर करण्याची मागणी आमच्या कार्यालयाकडून होत असून, तशा सूचना सर्व खाजगी हॉस्पिटल व्यवस्थापनास दिल्या गेल्या आहेत. तर ज्या हॉस्पिटलने अद्याप कोविड-१९ मुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची सदर कागदपत्रे सादर केलेली नाहीत, त्यांना ही कागदपत्रे लवकर सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ---------------------ऑनलाईनमुळे मृत्यू पास लवकर प्राप्त एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास संबंधितांच्या नातेवाईकांना सर्व कागदपत्रे घेऊन, आजपर्यंत वैंकुंठ स्मशानभूमी, ससून हॉस्पिटल, मनपाच्या प्रसुतीगृहात तसेच विश्रामबाग जन्म-मृत्यू कार्यालयात जावे लागत होते. त्यानंतरच तेथील कर्मचारी संबंधित मयताचा मृत्यू पास बनवित व तो प्राप्त झाल्यावर मयतावर अंत्यसंस्कार करता येत असत. पण आता विशेषत: कोविड-१९ मुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींचा मृत्यूपास ‘फॉर्म-४, नमुना-२, मयताचे आधारकार्ड व नातेवाईकांचे आधारकार्ड’ ही कागदपत्रे ऑनलाईन सादर केल्यास लागलीच प्राप्त होत आहे. परंतु, मृत्यू दाखल्यासाठी पुन्हा ही कागदपत्रे पुन्हा एकदा संबंधित कार्यालयात दाखल करावी लागत आहेत. ----------------------ऑनलाईन मृत्यू पास नागरिकांसाठी सोयीस्कर - श्रीनिवास कंदुल ऑनलाईन मृत्यू पास प्रक्रिया नागरिकांसाठी सोयीस्कर असून, या प्रकियेतूनच ऑनलाईन मृत्यूपास तयार होत असल्याने नागरिकांचा त्रास वाचत आहे. परंतु, प्रचलित पध्दतीनुसार जन्म-मृत्यू कार्यालयाकडून सर्व कागदपत्रे पुन्हा मागितली जात आहेत. त्यामुळे संबंधित हॉस्पिटलने तथा नातेवाईकांनी मृत्यू दाखल्यासाठी ही कागदपत्रे वॉर्ड ऑफिसला सादर करावीत, असे महापालिकेचे समन्वय अधिकारी तथा विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल यांनी सांगितले आहे. -------------------------------------------- मृत्यू दाखल्यासाठी महापालिकेकडून संबंधित मयत व्यक्तीची सविस्तर माहिती नोंदणीसाठी मागविली जाते. यात फॉर्म 4, नमुना 2 ही कागदपत्रे महत्वाची असून, ही कागदपत्रे राज्य शासनाकडूनही (साक्षांकित प्रतीत) नोंदीत ठेवल्या जात असल्याची माहिती राज्य शासनाच्या जन्म मृत्यू नोंदणी विभागाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. एन. डी. देशमुख यांनी दिली.
Corona virus : पुण्यात मृत्यू दाखल्यासाठीची पळापळ सुरूच; ऑनलाईन प्रक्रियेचा वापर फक्त नावालाच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 1:34 PM
ऑनलाईन साक्षांकित कागदपत्रेच सादर करा, अन्यथा दाखला नाही: जन्म-मृत्यू कार्यालयाकडून स्पष्टीकरण
ठळक मुद्देऑनलाईन प्रक्रियेचा वापर केला तर नागरिकांचा मोठा त्रास वाचेल असा महापालिकेचा दावा