पुणे : शहरात दाटीवाटीच्या वस्त्यांपासून उच्चभ्रू सोसायट्यापर्यंत सर्वत्र कोरोनाचे थैमान सुरू आहे. अशा परिस्थितीत 'डॉक्टर्स फॉर बेगर्स' अशी ओळख असलेले सोहम ट्रस्टचे डॉ. अभिजित सोनवणे आणि त्यांच्या पत्नी मनीषा सोनवणे अहोरात्र झटत आहेत. याचीच परिणती म्हणून आजवर एकही भिक्षेकरी कोरोनाबाधित झालेला नाही. डॉ. सोनवणे यांनी फेसबुकच्या माध्यमातून याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
- कोरोनाचे संक्रमण सुरू झाल्यापासूनच डॉ. अभिजित सोनवणे यांनी अनेक तज्ञांशी चर्चा करुन आणि जागतिक आरोग्य संघटनेची वेबसाइट पाहुन भिक्षेकरी समाजाबाबत काय करता येईल त्याचा आराखडा तयार केला आणि त्यानुसार विविध उपाययोजना अमलात आणल्या. पुण्यातील जवळपास १००० भिक्षेक-यांना एकत्र करुन आजाराची पार्श्वभूमी, घ्यायची काळजी आणि काळजी न घेतल्यास होणारे परिणाम त्यांना समजतील अशा भाषेत समजावून सांगितले.
सोहम ट्रस्टतर्फे सर्वांना रुमाल, मास्क, सॅनिटायझर, साबण आणि महिनाभर पुरेल इतकी तुरटी यांचे वाटप करण्यात आले. याव्यतिरिक्त प्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे, रक्तवाढीच्या गोळ्या व इतर आजारांत लागणारी सर्व औषधेही दिली जात आहेत. जगण्यासाठी रस्त्यांवर लागणारे सर्व साहित्य त्यांना पुरवण्यात येत आहे. पुणे व इतर जिल्ह्यांत तात्पुरती निवारा केंद्र स्थापन करुन रस्त्यांवर राहणाऱ्या बेघर लोकांची व्यवस्था करण्यास आराखडा सुचवला आहे. अशा अनेक निवारा केंद्रात बेघर आश्रितांना आधार मिळाला आहे.
भीक नसल्यामुळे उपासमार टळावी, यासाठी शक्य त्यांना किराणा माल घेण्यासाठी किंवा थेट किराणा माल देण्यात आला आहे. भिक्षेक-यांच्या आवश्यक त्या तपासण्या दर आठवड्याला सुरु आहेत. त्यांच्या लक्षणांवर लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे आजवर सर्व भिक्षेकऱ्यांचे कोरोनापासून सरंक्षण करण्यात यश मिळाले आहे. 'जिनकी जिंदगीही है रोना, भला उनका क्या बिगाडेगा कोरोना' अशा शब्दांत डॉ. सोनवणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
-------
रस्त्यामध्ये भीक मागत असताना एक गरीब दाम्पत्य डॉ. अभिजित सोनवणे यांच्या नजरेस पडले. कोरोना काळात नव-याची नोकरी गेली, तर पत्नीची धुण्या-भांड्याची कामे थांबली. घराचे भाडे द्याायला पैसे नाहीत म्हणून झोपडीतून तीन मुलांसह या कुटुंबाला हाकलून देण्यात आले. त्यांनी रस्त्यांवर मिळेल त्या ठिकाणी राहायला सुरुवात केली. जवळपासचे सर्व पैसे काही दिवसांतच संपले. पोरांना भूक लागल्यावर या आईबापाला भीकच मागावी लागली. डॉ. सोनवणे यांनी या जोडप्याला मदतीचा हात दिला. तळेगावला राजेंद्र पाटील या मित्राशी संपर्क साधला. पाटील यांनी आपल्या नर्सरीत त्यांना कामावर ठेवून घेतले आणि त्यांचा आर्थिक भार, मुलांचे शिक्षण ही जबाबदारीही उचलली.
...........................