शेलपिंपळगाव : तीर्थक्षेत्र आळंदी - देवाची (ता. खेड) येथील पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यासोबत देहू फाट्यावर तीन आणि धाकट्या पादुकाजवळ एक अशा एकूण दहा जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यापैकी पाच रुग्ण आळंदी हद्दीबाहेर वास्तव्यास असल्याने शहरातील रुग्णांची संख्या एकूण पाच आहे. मात्र अद्याप काही अहवाल येणे बाकी असल्याने आळंदीकरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मागील आठवड्यात आळंदी पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांच्यासोबतच्या सतरा पोलिसांची चाचणी करण्यात आली. यापैकी मंगळवारी पाच पोलिसांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर देहूफाट्यावर तीन व धाकट्या पादुकावरील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, आळंदीतील देहू फाटा येथील आर्या आर्केड, साई समृद्धी आणि आळंदी पालिका शाळा नंबर चारमधील कृष्णाई इमारतीकडील रस्ता सील करण्यात आला आहे. शहरातील चार ठिकाणच्या कंटेन्मेट झोनमधील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. बफर झोनमध्ये शिक्षकांच्या मार्फत सर्वेक्षण केले जात आहे. तर शहरात नगरपालिका प्रशासनाच्या वतीने औषध फवारणी केली जात असल्याचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आळंदी शहरात लॉकडाऊन करण्याची मागणी आळंदी विकास युवा मंच आणि नगरसेवक सचिन गिलबिले यांनी लेखी निवेदनाद्वारे पालिकेकडे केली आहे. लग्नासाठी बाहेर गावच्या लोकांना बंदी करून कार्यालयांनाही मज्जाव करणे आवश्यक आहे. भाजी मंडईही आठवडा बाजार बंद करण्याची मागणी आळंदीकरांकडून होत आहे.