पुणे : महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये कोरोना रुग्ण सापडण्याचा सपाटा सुरूच असून बुधवारी आरोग्य विभागातील तब्बल १२ कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. तर, अतिरिक्त आयुक्त कार्यालयातील दोन कर्मचारी बाधित असल्याचे समोर आले आहे. मुख्य इमारतीमधील प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेची मुख्य इमारतच कोरोना 'हॉट स्पॉट' ठरते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पालिकेच्या विविध विभागातील तब्बल २५० पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी बाधित झालेले आहेत. यामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. पालिकेच्या आठपेक्षा अधिक नगरसेवकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत चाललेला असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये आयुक्तांपासून सर्व वरिष्ठ अधिकारी बसतात. यासोबतच विविध कोविड केअर सेंटर्ससह विलगीकरण कक्षात काम करणारे अधिकारी, कर्मचारी, क्षेत्रीय कार्यालय स्तरावर काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी कामानिमित्त पालिकेत येत असतात. यासोबतच नागरिकही आपली कामे घेऊन मुख्य इमारतीमध्ये येत आहेत.
आरोग्य विभागाच्या शहरी गरीब योजनेसह विविध आरोग्य योजनांचा लाभ घेण्याकरिता नागरिक येत असतात. या विभागातील काही जणांना त्रास जाणवू लागल्याने बुधवारी आरोग्य विभागातील १०० कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटिजेन किटद्वारे तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये १२ जण पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. या सर्वांना उपचारांसाठी तातडीने पाठविण्यात आले असून काही जणांना गृह विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. पालिका इमारतीमध्ये कोरोनाचा फैलाव होऊ नये याकरिता प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे. जेणेकरून पॉझिटिव्ह असलेल्यांकडून अन्य कोणाला लागण होऊ नये. यासोबतच महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कार्यालयातील दोन शिपाई कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यावरही उपचार सुरू करण्यात आले आहेत. -------- कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक वरिष्ठ अधिकारी आणि विभागामध्ये रजिस्टर ठेवण्यात आले असून त्यामध्ये येणाऱ्या -जाणाऱ्यांची नोंद केली जात आहे. तसेच थर्मल गनच्या मदतीने शरीराचे तापमानही मोजले जात आहे.