पिंपरी : कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाला घरी आयसोलेटची व्यवस्था असतानाही घरमालकाने त्याला घरात घेतले नाही. त्यामुळे रुग्णाला पुन्हा वायसीएम रुग्णालयात जाण्याची वेळ आली. याबाबत माहिती मिळताच महापालिका अधिकाऱ्यांनी संबंधित घरमालकाशी संपर्क साधून गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. त्यानंतर रुग्णाला पुन्हा घरी आणून आयसोलेट करण्यात आले.
पिंपरीगाव येथील तपोवन मंदिर परिसरात भाडेतत्वारील घरात राहणाऱ्या एका नागरिकाला २६ जून रोजी कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर दोन दिवस वायसीएम रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना बालेवाडीतील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले होते. त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. तसेच त्यांची घरी आयसोलेट राहण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे महापालिकेने उपचाराला पाच दिवस पूर्ण झाल्यानंतर आणि रुग्णाला कोणताही त्रास होत नसल्याने बुधवारी (दि. १) घरी आयसोलेट होण्यासाठी कोविड केअर सेंटरमधून सोडून दिले. त्यांना १४ दिवस होम क्वारंटाईन राहण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार हा रुग्ण आपल्या भाड्याने असलेल्या थ्रीबीएचके फ्लॅटमध्ये आयसोलेट होण्यासाठी घरी आला. परंतु, मालकाने या रुग्णाला घरात येऊ देण्यास नकार दिला.महापालिकेने घरीच आयसोलेट होण्याची परवानी दिली असून त्याचे कागदपत्रे रुग्णाने दाखविले. तरीही, मालकाने घरात येऊ देण्यास नकार दिला. निगेटीव्ह रिपोर्ट असल्याशिवाय इमारतीत येऊ देणार नसल्याची भूमिका घेतली. अखेर रुग्णाला पुन्हा वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले.
याबाबत महापालिका प्रशासनाला माहिती देण्यात आली. त्यानंतर महापालिका अधिकाºयांनी घरमालकाशी संपर्क साधून त्यांची समजूत काढली. तसेच गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. त्यानंतर रुग्णाला घरात घेण्यास त्यांनी तयारी दर्शवली. त्यामुळे रुग्णाला पुन्हा वायसीएम रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सध्या रुग्ण घरी आयसोलेट आहे.
कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह असतानाही कोणतीही लक्षणे नसलेली रुग्ण जास्त संख्येने आहेत. यातील काही रुग्णांची घरी आयसोलेट होण्याची व्यवस्था आहे. अशा रुग्णांना घरी आयसोलेट होण्याची परवानगी दिली आहे. घरमालकांनी या रुग्णांना घरी आयसोलेट होण्यास विरोध करू नये, अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल.- संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड