पुणे : शहरात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे व्हेंटिलेटर गायब होत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या डॅशबोर्डवर ४ सप्टेंबरपर्यंत ५३१ व्हेंटिलेटर बेड दिसत होते. मागील सात दिवसांत त्यातील ६१ व्हेंटिलेटर गायब झाले असून शुक्रवारी (दि. ११) दुपारपर्यंत ४७० व्हेंटिलेटर होते. त्यापैकी एकही व्हेंटिलेटर बेड शिल्लक नव्हता. काही कारणांसाठी व्हेंटिलेटरची संख्या कमी होत असल्याने प्रशासनाचे ढिसाळ नियोजन रुग्णांच्या जीवावर बेतण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कोरोना विषाणुचा संसर्ग झालेल्या व इतर आजार असलेल्या अनेक बाधित रुग्णांची स्थिती गंभीर होत आहे. अनेकांना आॅक्सिजन द्यावा लागत आहे. त्यातील काही जणांना व्हेंटिलेटरची गरज भासते. शहरात उपलब्ध व्हेंटिलेटरची संख्या आणि रुग्णांचे प्रमाण व्यस्त आहे. अनेकदा व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी येतात. त्यासाठी जम्बो रुग्णालयाची उभारणी करण्यात आली. तिथे किमान ६० व्हेंटिलेटर उपलब्ध होतील अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात या ६० व्हेंटिलेटरची भर पडण्याऐवजी आधीचे व्हेंटिलेटरही कमी झाल्याचे चित्र आहे. शहरात एकट्या ससूनमध्ये १२३ व्हेंटिलेटर होते. जम्बो रुग्णालयात रुग्ण भरती होऊ लागल्यानंतर सुमारे ४० व्हेंटिलेटर तिकडे हलविण्यात आले. तर १० ते १५ व्हेंटिलेटरची दुरूस्ती सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जम्बोमध्ये सुरूवातीला ३० व्हेंटिलेटर दाखविण्यात येत होते. ससूनमधून दिलेले ४० व्हेंटिलेटर अद्याप सुरू करण्यात आलेले नाहीत. त्यातच ३० पैकी १५ व्हेंटिलेटर बंद करण्यात आल्याचे दिसते. शुक्रवारी दुपारपर्यंत डॅशबोर्डवर जम्बोमध्ये केवळ १५ व्हेंटिलेटर दिसत होते. त्यामुळे दि. ४ सप्टेंबरचा ५३१ व्हेंटिलेटरचा आकडा शुक्रवारी ४७० पर्यंत खाली आला आहे. दुपारी एकही व्हेंटिलेटर शिल्लक नव्हता. सात दिवसांत ६१ व्हेंटिलेटर कमी झाल्याने गंभीर रुग्णांचा आकड्याबाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.
-----------
जम्बोमध्ये व्हेंटिलेटर पडून
ससून रुग्णालय आॅक्सिजन यंत्रणेच्या दुरूस्तीचे काम केले जाणार असल्याने जम्बोमध्ये हलविण्यात आलेले सुमारे ४० व्हेंटिलेटर धुळखात पडून असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुर्वीच्या एजन्सीकडून योग्य नियोजन न केल्याने नवीन एजन्सी नेमण्यात आली आहे. कोणतीही घाई न करता रुग्ण वाढविले जात आहेत. पण ससूनमधील व्हेंटिलेटर तातडीने हलविण्याची घाई प्रशासनाने केली. शहरात एकही व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे डॅशबोर्डवर दिसत असताना जम्बोमध्ये मात्र व्हेंटिलेटर पडून आहेत.
---------------------
विभागीय आयुक्त कार्यालय डॅशबोर्ड (शुक्रवारी दुपारी ४ वा.
आॅक्सिजन बेड आयसीयु व्हेंटिलेटर
११ सप्टें. ३३३३ ४५२ ४७०
६ सप्टें. ३३७७ ४४४ ४८०
४ सप्टें. ३३७१ ३८० ५३१
-------------