उरुळी कांचन : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत मागील चोवीस तासांत कोरोनाचे नवे १२ रुग्ण सापडले तर आज सकाळी एक युवक पॉझिटिव्ह सापडल्याने रुग्णांची संख्या १३ झाली आहे व ती सातत्याने वाढत असून, गुरुवारी तीन रुग्णांना सकाळी रुग्णालयातून घरी सोडल्याने अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ३८ वर पोहचली आहे.
स्विटहोम मालकाचे कुटंबींय व कर्मचारी अशा बारा जणांचा स्वॅब (घशातील द्रव) तपासणीसाठी पाठवला होता. त्यात स्विटहोम मालकाची पत्नी, दोन मुले व व तीन कर्मचारी असे सहा जण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळुन आले आहे. यामुळे वरील दुकानातुन सोमवारपूर्वी मिठाई खरेदी करणारे शंभरहुन अधिक जणांचे धाबे दणाणले आहेत. मात्र स्विटहोम मालकाने मिठाई खरेदी करणाऱ्यांची नोंदच न ठेवल्याने आरोग्य विभागापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. यामुळे उरुळी कांचमनधील रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्विटहोम मालकापाठोपाठ, बॅक कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने बँकेतील अधिकारी, स्टाफ व मागील तीन दिवसात बँकेत आलेले ग्राहक यांची तपासणी करण्यात येणार आहे. उर्वरित पाच रुग्ण हे यापुर्वींच्या रुग्णांच्या संपर्कात आलेले आहेत. वरील १३ रुग्णामुळे उरुळी कांचन हद्दीतील मागील पंधरा दिवसाच्या कालावधीतील रुग्णांची एकुण संख्या ६७ वर गेली आहे. त्यापैकी २९ जण मागील कांही दिवसांत उपचार घेऊन, होम क्वारंटाईन झाले आहेत. तर सध्या अडोतीस अॅक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.