पुणे : कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण असलेला भाग हा ‘कंटेन्मेंट झोन’ म्हणून जाहिर करताना, तो पूर्णपणे सील केला पाहिजे असे आदेशातच नमूद केलेले आहे. त्यामुळे ज्या झोनमध्ये ये-जा करण्यास मोकळीक मिळत आहे, तो भाग व रस्ता पत्रे लावून सील करण्यात येत आहे. जर हा भाग सील केला गेला नाही तर,कंटेन्मेंट झोनचा मुळ उद्देश सफल होणार नाही. त्यामुळेच सध्या नवे झोन पूर्णपणे सील करण्याचे काम शहरात सुरू असल्याची माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. शहरातील कंटेन्मेंट झोनची पुनर्रचना करून पूर्वीचे २७ कंटेन्मेंट झोन रद्द करण्यात आले असून, नवीन २८ झोन केले गेले आहेत. परंतु, यातील काही झोनमध्ये आतील बाहेरील नागरिकांची ये-जा होत असल्याचे निदर्शनास आल्याने, तो भाग पूर्णपणे सील करण्याचे काम गेली दोन दिवस शहरात चालू आहे.कंटन्मेंट झोनमध्ये व्यापारी भाग स्वतंत्ररित्या खुला करता येत नसून, कंटन्मेंट झोन मध्ये ब्रेक करणे ही सध्या मोठी अडचण ठरत आहे़. उदाहरणार्थ, मुख्य शिवाजी रस्ता जर बंद केला नाही तर, २९ ठिकाणी बॅरिगेटस् लावावे लागत आहे. त्यामुळे कंटन्मेंटच्या सीमा रेषेवरील दुकानेच सुरू राहू शकतील. आपला मुळ उद्देश हा कंटन्मेंट झोनमधील पॉझिटिव्ह रूग्ण कमी करणे हा असून, काही दिवस तरी कंटन्मेंट भागातील मार्केट किंवा व्यापारी संकुल (जेथे रहिवास नाही अशी ) खुली होऊ शकणार नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने ज्या सूचना व मर्यादा घालून दिल्या आहेत. त्यापेक्षा अधिक सवलती अथवा त्या मर्यादेपेक्षा खाली जाऊन आपण निर्णय घेऊ शकत नाही. पण स्थानिक परिस्थिती पाहून या सवलती न देता अधिक कडक निर्णय घेऊ शकतो. त्यानुसारच सध्या तरी कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले रूग्ण आपण घरी सोडत नसल्याचेही गायकवाड यांनी सांगितले. -----------------
Corona virus : पुण्यातील ‘कंटेन्मेंट झोन’ होणार पूर्णपणे सील; महापालिकेकडून काम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 12:25 PM
झोनमध्ये ये-जा करण्यास मोकळीक मिळत आहे, तो भाग व रस्ता पत्रे लावून सील करण्यात येत आहे.
ठळक मुद्देशहरातील कंटन्मेंट झोनची पुनर्रचना करून पूर्वीचे २७ कंटन्मेंट झोन रद्द; नवीन २८ झोन