पुणे ; कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. पण हा विषाणू वाटतो तितका भयानक नाही. एखाद्याला या विषाणूची बाधा झाली तरी योग्यवेळी मिळालेल्या उपचाराने त्यावर मात करता येते. गुढीपाडव्या दिवशी अशाच दोघांना घरी सोडण्यात आले. हे खरे आहे की कोरोनासाठी कोणतीही लस किंवा ठराविक औषध उपलब्ध नाही. पण आपल्याकडील नेहमीच्या औषधानीही तो बरा होऊ शकतो. पण औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे आवश्यक आहे. त्यासाठीच या रुग्णांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. रुग्णांमधील लक्षणांवर औषधे दिली जात आहेत. हे औषधे सध्यातरी कोरोना विषाणूचा प्रभाव कमी करत आहेत.
नायडू रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याच्या संशयावरून रूग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांवर लक्षणावर उपचार केले जात आहेत. सध्या रुग्णालयात एकही गंभीर स्वरूपाचे लक्षणे असलेला रुग्ण नाही. त्यामुळे त्यांच्यावर नियमित उपचारच सुरू आहेत. रुग्ण कोरोना बाधित असेल तर त्याला अँटीव्हायरल असलेली ऑसेलटॅमीवीर (टॅमिफ्लू) ही गोळी सुरू केली जाते. पुढील सात दिवस ही गोळी दिली जाते. बहुतेक सगळ्यांनाच ही गोळी दिली जात आहे. त्याचा चांगला परिणामही जाणवत आहे. तसेच खोकल्यासाठी कॉफडेक्स हे पातळ औषध, आणि तापासाठी क्रोसिन ही गोळी दिली जात आहे. लक्षांनानुसार अमोक्सक्लेव हे औषध दिले जाते. सध्या नायडूतील रुग्णांना याच औषधांनी बरे केले जात आहे. लक्षांनानुसार काही औषधे बदलू ही शकतात. त्यामुळे कोणीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत. योग्य तपासणी करून घेतल्यानंतर डॉक्टर सांगतील तीच औषधे घ्यावीत असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. पोषक आहारही महत्वाचाऔषधांबरोबरच पोषक आहार मिळणेही महत्वाचे आहे. संसर्ग झालेल्या व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती कमी झालेली असते. त्यामुळे त्यांना संतुलित आहार मिळायला हवा. त्यानुसार नायडू मध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. प्रथिने, कर्बोदके, आवश्यक जीवनसत्व असलेला आहार दिला जात आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.