पुणे : परदेशवारी करून आलेल्या व पुणे शहरात वास्तव्यास असलेल्या ९ कोरोनाबाधित रुग्णांच्या घराच्या १ किमी अंतरातील घरांचे व तेथील नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे काम चालू आहे. आत्तापर्यंत ५७ हजार ७९९ नागरिकांचे यात सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणांतर्गत केवळ ६९ नागरिकांना सौम्य सर्दी, खोकला व ताप झाल्याचे आढळून आले तर, परदेशातून आलेल्या ११ जणांना होम क्वारंटाईन (घरातच विलग राहण्या)च्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या ६८ पथकांकडून, १६ मार्चपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या निवासस्थान परिसरात सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. या पथकांनी आजपर्यंत १७ हजार ८०५ घरांचे सर्वेक्षण केले असून, त्याद्वारे ४० हजार ७९९ नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना कोरोनासंबंधित लक्षणांची माहिती देऊन तपासणीही केली. २१ मार्च रोजी एका दिवसात ५ हजार ९५७ घरांचे सर्वेक्षण करून १८ हजार ८५५ जणांची वैयक्तिक भेट घेण्यात आली. यामध्ये ११ जण हे परदेशातून आल्याचे आढळून आले असून, त्यांचा परदेशातून आल्याचा कालावधी १४ दिवसांपेक्षा कमी असल्याने त्यांना होम क्वारंटाईनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरात आत्तापर्यंत ज्या भागातील व्यक्ती परदेशातून आली आहे व तिला कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत, अशांना लागलीच डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.परंतु, त्याच वेळी खबरदारी म्हणून ती व्यक्ती राहत असलेल्या १ किमी परिसरातील घरांचीही तपासणी करण्यात येत आहे. सुदैवाने यात कोणालाही कोरोनासंबंधी लक्षणे आढळून आलेली नाहीत. पालिकेच्या या पथकांकडून हे काम नित्याने चालू असून, दररोज शेकडो घरांचे व हजारो नागरिकांचे सर्वेक्षण केले जात आहे. यामध्ये संशयित रुग्णाच्या निवासस्थानी व परिसरात जंतुनाशकाची फवारणी करण्यात येत आहे. तसेच, घरातील विलगीकरण कक्ष कसा तयार करायचा, याची माहिती दिली जात असून, त्याचा दैनंदिन अहवाल मुख्यालयाला सादर केला जात असल्याची माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी ‘लोकमत’ला दिली.०००
Corona virus : कोरोनाबाधितांच्या एक किमी परिसरातील ५७ हजार जणांचे सर्वेक्षण पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 8:06 PM
सर्वेक्षणांतर्गत केवळ ६९ नागरिकांना सौम्य सर्दी, खोकला व ताप झाल्याचे आढळून आले.
ठळक मुद्देपरदेशातून आलेल्या ११ जणांना होम क्वारंटाईन (घरातच विलग राहण्या)च्या सूचना