राजानंद मोरे -
पुणे : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ सुरू झाली आहे. विलगीकरण कक्ष वाढविणे तसेच व्हेंटिलेटरसह पीपीई कीट, मास्क आदी वैद्यकीय साहित्याचे जुळवाजुळव केली जात आहे. सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यात जेमतेम ४०० च्या जवळपास व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. सध्या बाधित रुग्णांपैकी एक-दोन रुग्णांनाच व्हेंटिलेटरची गरज भासत आहे. पण दक्षता न घेतल्यास हा आकडा वेगाने वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास आरोग्य यंत्रणा कोलमडून 'व्हेंटिलेटर'वर येईल. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाची लागण होऊ नये किंवा तशी लक्षणे आढळल्यास योग्यप्रकारे काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.चीन, अमेरिका, इटली, जर्मनीसारख्या प्रगत देशांत कोरोनाने हाहाकार उडविला आहे. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा असतानाही तेथील कोरोनाची साथ आटोक्यात येत नाही. इटलीमध्ये मृतांचा आकडा वेगाने वाढत आहे. सुदैवाने अशी परिस्थिती अद्याप भारतात उद्भवलेली नाही. पण दक्षता न घेतल्यास भारतासारख्या अधिक लोकसंख्या असलेल्या देशात ही स्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. रुग्णांचा आकडा वेगाने वाढत गेल्यास आरोग्य यंत्रणेवर खुप ताण येईल. प्रगत देशांच्या तुलनेत आपली यंत्रणा त्याचा सामना करण्यासाठी सक्षम नाही. त्यामुळे अधिक ताण आल्यास ती कोलमडून जाईल, अशी भिती राज्याच्या साथरोग प्रतिबंधक तांत्रिक समितीचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच त्यांनी लोकांना काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे.आरोग्य विभागाकडील माहितीनुसार, पुणे जिल्ह्याचा विचार केल्यास दि. ३१ मार्च अखेरीस एकुण ५५८ रुग्णालये आहेत. त्यामध्ये १४१ सरकारी रुग्णालयांचा समावेश आहे. या रुग्णालयांमध्ये एकुण २ हजार ४३६ डॉक्टर्स असून त्यापैकी ५३३ डॉक्टर्ससरकारी रुग्णालयात आहेत. व्हेंटिलेटर्सची संख्या तर रुग्णालयांऐवढीही नाही. जिल्ह्यात एकुण ३९१ व्हेंटिलेटर्स उपलब्ध असून सरकारी रुग्णालयात केवळ ३६ आहेत. सध्याची रुग्णसंख्या तसेच व्हेंटिलेटरची आवश्यकता असलेल्या रुग्णांची संख्या कमी आहे. पण रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेकडून अधिकच्या सुविधा उभारणे व व्हेंटिलेटरसह अन्य उपकरणांची जुळवाजुळव आधीपासूनच सुरू करण्यात आली आहे. व्हेंटिलेटर सहज उपलब्ध होत नाही. भारतामध्ये परदेशातूनच व्हेंटिलेटर आयात करावे लागतात. त्यामुळे त्याची उपलब्धता ही सोपी बाब नाही.------------पुण्याची लोकसंख्या ७५ लाखांहून अधिक आहे. त्यातुलनेत केवळ १४०० ते १५०० आयसीयु बेड तर एक हजारांहून कमी व्हेंटिलेटर असतील. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग न पाळल्यास अनेक लोकांना संसर्ग होऊ शकतो. बाधित लोकांपैकी ४ ते ५ टक्के लोकांना अतिदक्षता विभागाची गरज असते. तर त्यातील ५० टक्के लोकांना व्हेंटिलेटर लागु शकतो. रुग्णसंख्या वाढल्यास गरजु रुग्णांनाही व्हेंटिलेटर उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे लोकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. भारतात अमेरिका किंवा युरोपीयन देशांतून व्हेंटिलेटर येतात. त्याची किंमत ७.५ ते १२ लाख रुपये एवढी असते. त्यामुळे ते सहज उपलब्ध होत नाहीत. तसेच कुशल मनुष्यबळाचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो.- डॉ. संजय ललवाणी, वैद्यकीय संचालक, भारती हॉस्पीटल--------------सध्या आपण तिसºया टप्प्यात प्रवेश करत आहोत. रुग्णांची संख्या वाढत असून मृत्यूचे प्रमाणही वाढतेय. अमेरिका, इटलीसारख्या देशांसारखी स्थिती उदभवल्यास आपल्याकडे व्हेंटिलेटर्सचा तुटवडा जाणवेल. ते सहज उपलब्ध होत नाहीत. तसेच किंमतही ४ त २५ लाखांपर्यंत असेत. त्यासाठी आतापासूनच तयारी ठेवावी लागणार आहे. छोट्या रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरची संख्या दोन-तीन असते. तेथील व्हेंटिलेटर कोरोनासाठी दिल्यास अन्य रुग्णांची अडचणी होऊ शकते. त्यामुळे शासनाला तशी विनंती केली आहे. पण खुप गरज भासल्यास हे व्हेंटिलेटर घ्यावे लागतील.- डॉ, अविनाश भोंडवे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र--------------