पुणे : कोरोनाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. परंतु, कुठलीही लक्षणे नाहीत, कुठलाही अन्य आजार नाही़ अशा कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांना आता रूग्णालयात दाखल करून घेण्यात येणार नाही. यामुळे शहरात दररोज नव्याने आढळून येणाऱ्या शेकडो कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांपैकी सुमारे ६० ते ६५ टक्के रूग्णांना घरी पाठविण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शनिवारपासून (आजपासून) करण्यात येणार असून, याबाबतच्या सूचना पालिकेच्या सर्व कोविड केअर सेंटर व खाजगी रूग्णालय प्रमुखांच्या बैठकीत देण्यात आल्या आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने कोरोनाची अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या रूग्णांना, त्यांच्या घरामध्येच योग्य प्रकारची सुविधा असल्यास 'होम क्वारंटाईन' करावे अशा सूचना दिल्या होत्या. याची प्रत्यक्ष अंमलबजावणी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शनिवारपासून केली जाणार आहे. परंतु, ज्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचे वय ६० च्या पुढे आहे. तसेच ज्या रूग्णांना बी़पी़ डायबेटिस, हृदयविकार आदी आजार बळावलेले आहेत, अशा रूग्णांना मात्र घरी सोडण्यात येणार नसून त्यांच्यावर रूग्णालयातच उपचार केले जाणार आहेत़ सद्यस्थितीला शहरात दररोज साधारणत: सरासरी २५० ते ३०० कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून येत आहेत. यापैकी ६० टक्के रूग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह असूनही कुठलीही लक्षणे नसलेले तथा इतर आजार नसलेले तर काही अति सौम्य लक्षणे असलेले रूग्ण आहेत. अशा रूग्णांची अहवाल प्राप्तीनंतरची आरोग्य तपासणी महापालिकेच्या कोविड केअर सेंटर तसेच खाजगी हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहे. यात पॉझिटिव्ह रूग्णाच्या बी़पी़, शुगर, शरिरातील आॅक्सिजनचे प्रमाण आदी तपासण्या करण्यात येणार आहे. या तपासणीत सदर रूग्णावर घरी उपचार करण्यास काही हरकत नाही असे आढळून आल्यास, संबंधित रूग्णाकडून पुढील १४ दिवस घरी राहणार असल्याचे हमीपत्र लिहून घेण्यात येईल. त्यानंतर त्याच्या हातावर 'होम क्वारंटाईन' चा शिक्का मारून त्याला घरी सोडण्यासाठीची कार्यवाही केली जाणार आहे. तसेच घरी सोडण्यात आलेल्या प्रत्येक रूग्णांची पुढील १४ दिवस आरोग्य विषयक विचारपूस व औषधोपचाराबाबतचे मार्गदर्शन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दररोज करण्यात येणार आहे. ------------महापालिकेच्या कोविड केअर सेंटर प्रमुख, खाजगी हॉस्पिटल प्रमुखांची पुणे महापालिकेत शुक्रवारी बैठक संपन्न झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिकेचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले. दरम्यान, लक्षणे नाहीत, कुठला आजार नाही पण जे कोरोना पॉझिटिवह झोपडपट्टी परिसरात व दाटवस्तीमध्ये राहतात, अशा रूग्णांना मात्र घरी सोडण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ---------------------
Corona virus : पुण्यात आता कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्यांना रूग्णालयात उपचार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 9:36 PM
६० टक्के कोरोना पॉझिटिव्ह आता घरीच ‘होम क्वारंटाईन’
ठळक मुद्देपालिकेच्या सर्व कोविड केअर सेंटर व खाजगी रूग्णालय प्रमुखांच्या बैठकीत याबाबतच्या सूचना बी़पी़ डायबेटिस, हृदयविकार आदी आजार असलेल्या रूग्णांना मात्र रूग्णालयातच उपचार