पिंपरी : कोरोनाचा विळखा घट्ट होत असून एकाच रुग्णालयात उपचार घेणाऱ्या तीन सख्या भावांचा अवघ्या आठवड्यात कोरोनाने बळी घेतला आहे. एकाच घरातील कलापुरे कुटूंबातील सख्या भावंडाचा बळी जाण्याची ही पहिलीच घटना आहे. पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना बाधितांच्या संख्येने आता १२ हजारांचा टप्पाही ओलांडला आहे.
पोपटराव कलापुरे (वय 66), ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कलापुरे (वय 63) आणि दिलीपराव कलापुरे (वय 61, सर्व रा. पिंपरीगाव) असे तीन भावंडांची नावे आहेत. कलापुरे कुटूंबिय गेल्या चार वर्षांपासून पिंपरीगावात एकत्र राहत आहे. यापूर्वी ते खराळवाडी भागात राहण्यास होते. 5 जुलै रोजी त्यांच्या कुटूंबातील एका मुलास कोरोनाची बाधा झाली. त्यांचे एकत्र कुटूंब असल्याने घरातील सर्व 18 जणांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये कुटूंबातील सर्वचजण करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर चिंचवडमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
पोपटराव, ज्ञानेश्वर आणि दिलीपराव या तिघांनाही ह्रदयासंबंधित आजार होते. आपल्याला कोरोना झाल्याची धास्ती या तिघांनीही घेतली. यापैकी दिलीप यांना प्रथम अतिदक्षता विभागात व्हॅन्टीलेटरवर ठेवले. त्यानंतर पोपटराव आणि ज्ञानेश्वर यांनाही श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तिघांनाही अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. 10 जुलै रोजी उपचारादरम्यान दिलीप यांचा मृत्यू झाला. यामुळे पोपटराव आणि ज्ञानेश्वर हे आणखीनच घाबरले. त्यानंतर पोपटराव यांचा 15 जुलै रोजी तर ज्ञानेश्वर यांचा 17 जुलै रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकाच घरातील तीन भावंडांचा कोरोनामुळे अवघ्या नऊ दिवसांत मृत्यू झाला.
पोपटराव कलापुरे हे महापालिकेच्या नोकरीतून सेवानिवृत्त झाले होते. ते कामगार नेते म्हणून सुपरिचित होते. तसेच त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कामगार पथसंस्थेचे अध्यक्षपदही भूषविले होते. तर ज्ञानेश्वर कलापुरे हे हिंदुस्थान ऍण्टीबोटिक्स कंपनीतून निवृत्त झाले होते. ते पैलवान म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. तर तिसरे बंधू केएसबी पंप्स या कंपनीतून निवृत्त झाले होते. ते देखील पैलवान म्हणून प्रसिद्ध होते. यांच्या निधनामुळे पिंपरी चिंचवड शहरात हळहळ व्यक्त होत आहे.