Corona virus : पुणे जिल्ह्यात तातडीने तीन जम्बो रुग्णालये उभी करा: उपमुख्यमंत्री अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 02:47 PM2020-07-27T14:47:40+5:302020-07-27T15:00:12+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निधी कमी पडू देणार नाही.
पुणे: कोरोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस राज्यासह पुणे, पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण भागात प्रचंड वेगाने वाढतो आहे. कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी व सरकार, प्रशासन , वैद्यकीय यंत्रणा आपआपापल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्याच धर्तीवर पुणे जिल्ह्यात तात्काळ तीन जम्बो रुग्णालयांच्या निर्मितीचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मूलन आढावा बैठक पार पडली. या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, सहकार आयुक्त अनिल कवडे, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनु गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, शासनाचे वैद्यकीय सल्लागार डॉ. सुभाष साळुंके, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले, खासगी रुग्णालयांकडून कोरोना बधितांवरील उपचार करताना अवास्तव बिले आकारण्यात येत असल्याच्या विविध तक्रारी आल्या आहेत. आधीच कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या रुग्णांचे कुटुंबीय हतबल होतात. त्यामुळे यापुढे खासगी रुग्णालयांची कोरोना उपचारांची बिले ही राज्य सरकारने निश्चित केलेल्या दरानुसार आहे की नाही याची देखील तपासणी केली जाणार आहे. ही सर्व बिले लेखा परिक्षकांकडून तपासण्यात येणार आहे.
पुणे, पिंपरी चिंचवड मधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन काही कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांसंबंधी तातडीने पावले उचलावी लागणार आहे.तसेच प्रतिबंधक उपायांसह पायाभूत सुविधांचा प्रश्नही मार्गी लावण्यात असल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठीच्या सुविधा उभारणीबाबतचे प्रशासकीय पातळीवरील नियोजन गतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांनी कोरोना उपचार व्यवस्थेबाबत तसेच उपलब्ध आरोग्य यंत्रणेतील मनुष्यबळ तसेच संभाव्य स्थिती विचारात घेत करण्यात येत असलेल्या नियोजनाबाबत माहिती दिली.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. कोरोना संसर्ग रोखण्यासोबतच पुणे शहरासोबतच ग्रामीण भागात आरोग्य सुविधा अद्ययावत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार व पिंपरी चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिका क्षेत्रात कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांविषयी माहिती दिली.