पुणे : शहरातील काही भागात कोरोनाचा संसर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. यावर तातडीने पोलिसांनी कार्यवाही सुरू करून आगामी काळातील धोका टाळण्यासाठी तो परिसर पूर्णपणे 'सील' करण्यात आला आहे. या भागातील नागरिकांशी संवाद साधला असता त्यांनी आपण सर्वांनी एकमेकांना सहकार्य करून कोरोनाशी लढले पाहिजे. असा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच आपल्यासाठी अखंडपणे कार्यरत असणाऱ्या पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. आज आमच्यावर पहारा आहे. उद्या तो तुमच्यावर असेल. ते होऊ नये यासाठी काळजी घ्यावी. अशा भावना सध्या संचारबंदी असणाऱ्या भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पोलीस प्रशासनाने शहरातील काही भागात संचारबंदी लागू केली आहे. त्यात मंगळवार पेठ, नाना पेठ, रास्ता पेठ, भवानी पेठ, रविवार पेठ, कागदीपुरा, कामगार पुतळा चौक, चांदतारा चौक, घोरपडे पेठ, कॅम्प परिसर यासारख्या अनेक भागांमध्ये नागरिकांना ये जा करण्यास मनाई करण्यात आली आहे. असे असताना देखील अद्याप काही नागरिक पोलिसांच्या आदेशाचे पालन करताना दिसत नाहीत. काही ठिकाणी पोलिसांना नागरिकांनी उत्तम सहकार्य केले आहे. पोलिसांचे आदेश पाळून कायदा सुव्यवस्था नियंत्रित ठेवण्यात हातभार लावला आहे. येवलेवाडी परिसरात अनेक उच्चभ्रू सोसायटी आहेत. या सोसायटीना दिलेल्या आदेशानुसार बाहेरील लोकांना आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. तसेच कालपासून भाजीपाला विक्री पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. किराणा मालाची दुकानेही बंद करण्यात आली आहेत. या भागातील नागरिकांना किराणा माल आणण्यासाठी येवलेवाडीतील डी मार्टमध्ये जावे लागत आहे. मेडिकल आणि किरकोळ विक्रेत्यांची दुकाने चालू ठेवली आहेत.
कोंढवा खडीमशीन भागातील नागरिक नियमांचे पालन करत नाहीत. ते सातत्याने रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळे पोलिसांना मेडिकल सोडून सर्वच काही बंद करावे लागत आहे. असे उच्चभ्रू सोसायटीमधील नागरिकांनी सांगितले आहे. शिवाजीनगर भागातील नागरिकांनी कफ्युर्ला पूर्णपणे पाठिंबा दिला आहे.याभागात जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला सकाळी दोन तासात मिळत आहे. त्याचप्रमाणे सर्व मेडिकल दिवसभर उघडी आहेत. नागरिक शक्यतो रस्त्यावर गर्दी करत नाहीत. या भागात मंडळाच्या कार्यकर्त्यांकडूनही खबरदारी घेतली जात आहे. असे नागरिकांनी सांगितले आहे.* रविवार पेठ भागातही कर्फ्यु लागू केला आहे. पण याठिकाणी नियमांचे उल्लंघन केले जात आहे. येथे नागरिकांच्या मनमानीमुळे किराणा माल, दूध डेअरी बंद करावी लागत आहे. या भागातील मस्जिदमध्ये नमाज पाडण्यासाठी नागरिक जमत आहेत. मस्जिद प्रवेश बंद केला तरी नागरिक दुसऱ्या प्रवेशद्वारातून मस्जिदमध्ये जात आहेत. किराणा माल बंद असल्याने त्या भागातील राजकीय नेते घरोघरी गहू, तांदूळ देत आहेत.