लोणी काळभोर : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका राजकीय महिला पदाधिकाऱ्याचा कोरोना संसर्ग तपासणीसाठी घेतलेला स्वॅब (घशातील द्राव ) चा तपासणी अहवाल शासकीय प्रयोगशाळेने बाधित नसल्याचा दिला. परंतु, खाजगी प्रयोगशाळेने सलग दोन वेळा चुकीचा अहवाल दिल्याने या खासगी प्रयोगशाळेच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसात शुक्रवारी (दि. १२ )रात्री उशिरा लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. खासगी प्रयोगशाळा अशाप्रकारे चुकीचा अहवाल देवून नागरिकांची फसवणूक करत असल्याचा धक्कादायक प्रकार पूर्व हवेलीत उघडकीस आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका राजकीय महिला पदाधिकाऱ्याला कोरोनाची प्राथमिक लक्षणे जाणवू लागल्याने या महिलेचा स्वॅब सोमवारी (दि. ८ जून ) हडपसर व पुणे शहरातील दोन खासगी प्रयोगशाळेत पाठवले होते. दोन्ही प्रयोगशाळेचे तपासणी अहवाल परस्परविरोधी आल्याने स्वॅब पुन्हा गुरुवारी ( दि. ११ जून ) पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. या प्रयोगशाळेचा अहवाल निगेटिव्ह आल्याने वरील महिला व तिच्या कुटुंबियांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता.
मात्र, एक प्रयोग म्हणून याच महिलेचा स्वॅब पुन्हा नायडू व ससून रुग्णालयातील प्रयोगशाळा तसेच हडपसर येथील खासगी प्रयोगशाळा व पुणे शहरातील त्याच प्रयोगशाळेत पाठवण्यात आला. याही वेळेस पुणे शहरातील प्रयोगशाळा वगळता, वरीच चार प्रयोगशाळांनी अहवाल निगेटिव्ह दिला. तर कोरोना चाचणीसाठी पुणे महानगर पालिकेशी टायअप असणाऱ्या पुणे शहरातील त्या खासगी प्रयोगशाळेने मात्र त्याच महिलेचा रिपोर्ट दुसऱ्या वेळीही पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल दिला होता. पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्था, ससुन रुग्णालय तसेच हडपसर येथील खाजगी रुग्णालयाच्या प्रयोगशाळेनेही अहवाल तब्बल पाचवेळा निगेटिव्ह दिला होता. त्यामुळे शासकीय प्रयोगशाळा निगेटिव्ह अहवाल देत असताना, खासगी प्रयोगशाळा मात्र तोच अहवाल पॉझिटिव्ह देत असल्याने संबधित महिला पदाधिकाऱ्याच्या मुलाने लोणी काळभोर पोलिसांत तक्रार दिली आहे. याबाबत विश्वराज रूग्णालय वरिष्ठ अधिकारी डॉ. पी. के. देशमुख यांनी चुकीचा अहवाल दिल्याच्या आरोपावरुन प्रयोगशाळा व्यवस्थापनाकडे लेखी तक्रार करण्यात आली असल्याचे सांगितले आहे. .......................हे प्रकरण गंभीर असून याची सखोल चौकशी सुरु करण्यात येणार आहे. चौकशीत पुणे येथील खासगी प्रयोगशाळेची चूक आढळल्यास प्रयोगशाळेच्या व्यवस्थापनाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणार आहोत.- वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर