पुणे : शहरातील मध्य वस्तीतील पोलीस ठाण्यात सर्व प्रथम कोरोना बाधित पोलीस कर्मचारी आढळून आला होता. त्याच पोलीस ठाण्याच्या शेजारील पोलीस ठाण्यामधील दोन पोलीस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यामुळे या पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या ४० पोलीस कर्मचार्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
शहरात सर्वप्रथम मध्य वस्तीतील एका पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचार्याला कोरोनाची लागण झाली होती. या पोलीस ठाण्यातील ८ कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्याच पोलीस ठाण्यातील एका कर्मचार्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकाच इमारतीत एकाच मजल्यावर असलेल्या दुसर्या पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांमध्ये घबराट निर्माण झाली होती. त्यांनी आमच्या सर्वांची कोरोना चाचणी घ्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, कोरोनाचे जे निकष आहेत, त्यामध्ये हे बसत नसल्याचे सांगून त्यांची चाचणीच मागणी फेटाळण्यात आली होती. त्यामुळे निवृत्तीकडे झुकलेले अधिकारी व कर्मचारी मनातून घाबरले असले तरी आदेशामुळे कामावर येत होते. आता या पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकार्यांनाच लक्षणे दिसू लागल्याने त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यात ते पॉझिटिव्ह आढळून आले.त्यामुळे त्यांच्या संपर्कात असलेले ४० पोलीस कर्मचार्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. पुणे शहर पोलीस दलातील २७ हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना कोरोनाची लागण झालीआहे. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.