पुणे: सलग ४५ दिवसांच्या लॉकडाऊन वर प्रशासनाच्या निर्णयातील संदिग्धतेमुळे पाणी पडले आहे. सर्वाधिक कोरोना रूग्ण सापडलेल्या पूर्व भागात अनेक नागरिक शुक्रवारी सकाळी बिनदिक्कतपणे फिरताना दिसत होते. त्यांना व मागील महिनाभर त्यांच्यावर नियंत्रण ठेवून असणाऱ्या प्रशासनाला कसलीच काळजी नसल्याचे चित्र या भागात दोनच दिवसात तयार झाले आहे.शहराचा मध्यभाग असलेल्या सर्व रविवार, सोमवार अशा सर्व पेठा, बोहरी आळी, गंजपेठ, मासेआळी, लोहियानगर, टिंबर मार्केट, मोमीनपूरा, डाळ आळी, दगडूशेठ हलवाई गणपती, त्यापुढे मंडई, बाजीराव रस्ता, चिंचेची तालीम या सर्व भागात कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. पुण्याचे सगळे सार्वजनिक आरोग्य या भागावर अवलंबून आहे. त्यामुळेच मागील दिड महिना या भागात कडक लॉकडाऊन पाळण्यात येत होते.
गल्लीबोळात असलेल्या वाड्यांमध्ये जाऊन महापालिकेचे सर्वेक्षण करणारे कर्मचारी मास्कचे वाटप करत होते. फुकट मिळणारे हे मास्क घेण्यासाठी या कर्मचाऱ्यांभोवती झुंबड ऊडत होती. सुरूवातीला सर्वांचे नाव पत्ते घेणाऱ्या कर्मचाऱ्याने थोड्याच वेळात फक्त कुटुंब प्रमुखांचे नाव व सदस्य संख्या सांगा असे म्हणत स्वत:ची या किचकट कामातून सुटका करून घेतली. त्या कागदांवर सह्याही मग त्याच्याच सहकायार्ने ठोकल्या.
दुकाने बंद असूनही बेकर्या, भाजीपाला, दुध डेअरी खुल्या असल्याने त्यांच्यासमोर गर्दी होती. दत्तवाडीत तर भाज्यांचे लहान लहान वाटे लावून अनेकजण भाजी विकत होते. त्यांच्याकडेही गर्दी होती. कसलीही स्वच्छता नाही, कोणीही मास्क वगैरे लावलेला नाही अशा त्या गर्दीकडे ना कोणाचे लक्ष होते, ना त्यांना कोणी हटकत होते. दत्तवाडी पोलिस चौकी, गंजपेठ पोलिस चौकी यांना अगदी लागून हे प्रकार सुरू होते. दोन्ही ठिकाणी काही पोलिसांना विचारले तर त्यांनी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने ऊघडी ठेवायची ही वेळ आहे, इथे असेच चालते असे ऊत्तर अतीशय शांतपणे दिले. मग त्यांचे त्यांनाच काही वाटून त्यांनी गर्दीला हटकण्यास किरकोळ सुरूवात केली.
या भागातील नागरिकांना कोरोना विषाणू ,संसर्ग, लॉकडाऊन सगळ्याची नीट माहिती आहे, मात्र त्यापासून काळजी कशी घ्यावी याचीच वानवा आहे. सरकारी सुचना मोडण्यासाठीच आहे याची त्यांना जणू खात्रीच आहे. त्यात त्यांना थरार वाटतो. त्यामुळेच फुकट मिळणाऱ्या रेशनिंगच्या रांगेत नंबरवरुन जोरात भांडणे होतात. दारूच्या दुकानांसमोर सकाळपासून आंघोळ वगैरे न करताही रांग लावण्याचे त्यांना काहीही वाटत नाही. त्यांची जगण्याची शैलीच माहिती नसल्याने प्रशासन त्यांच्या पचनी न पडणारे निर्णय घेऊन शहराला आणखी धोका निर्माण करत आहे असेच इथल्या काही समजदार नागरिकांचे म्हणणे आहे.------कोणती दुकाने कधी ऊघडायची याबाबत प्रशासनाने वेळापत्रक तयार केले असल्याचे सांगतात, आम्ही स्वत: दुकानदार असून आम्हालाच ते माहिती नाही. माहिती असूनही ते पाळायचे म्हटले तर इतरजण ते पाळत नाहीत. गर्दी होणारच कारण इथल्या लोकसंख्येच्या प्रमाणात दुकानांची संख्या कमी आहे. सुरूवातीपासूनच दुकाने जास्तीतजास्त वेळ खुली ठेवायला हवी होती.अजय उणेचा,किराणामाल दुकानदार-------मी इथे गेल्या अनेक वर्षांपासून राहतो. नागरिकांना विश्वासात घेऊन प्रशासनाने निर्णय घ्यायला हवे होते. हे लोक ज्यांना मानतात त्या सर्व पुढारी, पदाधिकाऱ्यांना प्रशासनाने काहीही सांगितले नाही. त्यामुळेच नियम मोडण्याकडेच सर्वांचा कल आहे.- सुहास गणबोटे,व्यावसायिक छायाचित्रकार-------गरीब कष्टकरी वर्गाचा हा सर्व भाग आहे. त्यांना रोज कमवावे लागते व मगच खावे लागते. कमाई बंद आणि जगा असे सांगितल्यावर कोण शांत बसून राहील? त्यामुळेच ऊधारी, चोरी, कामे असे काहीही करून पैसे मिळवणे, वस्तूंचा साठा करणे, फुकट मिळणाऱ्या सगळ्या गोष्टींसाठी गर्दी करणे असे प्रकार होणारच.बाळासाहेब रांजणे-----सरकार काही देत नाही, आम्हाला कमवूही देत नाही, साठवलेले सगळे पैसे संपले, आता दुकान बंद, मग पोराबाळांना खायला काय घालायचे, निवारा केंद्रात घेऊन जायचे का?मोमीनपुरा येथील एक नागरिक