पुणे : पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या अजून आटोक्यात आली नाही. त्यामुळे या दोन ठिकाणी आपण विशेष दक्षता घेत आहोत. या दोन्ही ठिकाणी आपण टेस्टिंग, स्क्रिनिंगचे प्रमाण वाढवत आहोत. तर पुणे महापालिका क्षेत्रात बाधित रूग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. ही बाब दिलासादायक आहे, असे मत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केली.
राव म्हणाले, मागील ५० दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील टेस्टिंगचे प्रमाण महाराष्ट्रात नव्हे, संपूर्ण देशात सर्वात जास्त आहे. त्याचे कौतुक केंद्र शासनाने देखील केले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामीण भागासाठी ५० हजार अॅन्टिजेन किट घेण्यात येणार आहे. ५० टक्के टेस्टिंग आरटीपीसी तर ५० टक्के अॅन्टिजेनद्वारे रूग्णांचे टेस्टिंग करण्यात येत आहे.
पुणे जिल्ह्याची कोरोना संसर्गाची स्थिती पाहता महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेतून रूग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. आतापर्यंत ११४ रूग्णांना प्लाज्मा देण्यात आला आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये. एखाद्या रूग्णाला प्लाज्मा हवा असेल तर तातडीने प्लाज्मा देण्याच्या सूचना महापालिका आणि ग्रामीण भागातील रूग्णालयांना दिल्या आहेत. त्याची उपलब्धतता करण्यात येत आहे, असे राव यावेळी म्हणाले.
...तर कंपन्यांना नोटीस पाठवू
ग्रामीण भागातील काही कंपन्या कोरोनाबाबत दक्षता घेत नाहीत, अशा प्रकारच्या तक्रारी लोकप्रतिनिधींनी केल्या आहेत. विशेषत: चाकण औद्योगिक क्षेत्रातील अनेक कंपन्या नियमांचे पालन करत नसल्याची तक्रार आमदारांनी केली आहे. कंपन्या जर कामगारांप्रती विशेष काळजी घेत नसतील तर अशा कंपन्यांना नोटीस देण्यात येत आहे. तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सौरभ राव यांनी सांगितले.