पुणे : कोरोना जागतिक साथ उद्रेक सुरु असतानाच या आजारावर लस शोधण्याचे अविरत प्रयत्न सुरु आहेत. या अनुषंगाने कोविड १९ या आजारावर लवकरच लस उपलब्ध होईल असे अनुमानित करून भारत सरकारने तयारी सुरु केली आहे. लस उपलब्धतेनंतर ती वेगाने जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे. शासनाच्या सुचनेनुसार पुणे जिल्ह्यात सर्वात प्रथम सुमारे १ लाख १० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, या माध्यमातून लसीकरणासाठी प्राधान्य घटक ठरवणे, लसीकरण मागणी, साधनसामुग्री व लस देण्याबाबतची व्यवस्थेबाबत मार्गदर्शक सूचना ठरवण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून सीव्हीबीएमएस ही प्रणाली तयार करण्यात येत आहे. प्रथम फेरीत आरोग्य संस्था व आरोग्य व्यवस्थेत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची माहिती एकत्र करण्यात येत आहे. यामध्ये खाजगी व शासकीय संस्था यांचा समावेश आहे. या घटकांना लस उपलब्ध झाल्यानंतर कोविड १९ लसीकरणामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे व यांच्या माध्यमातून पुढील लसीकरण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. -------या लोकांना कोरोना लस सर्वात आधी अग्रभागी कार्यरत कर्मचारी , आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा स्वयंसेविका,गटप्रवर्तक, तालुका समूह संघटक तसेच अंगणवाडी सेविका इत्यादी, नर्स , सर्वे करणारे कर्मचारी, सुपरव्हायजर, वैद्यकीय अधिकारी, पॅरामेडिकल स्टाफ, शास्त्रज्ञ आणि संशोधक, मेडिकलचे विद्यार्थी. ------- गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून शासकीय व खाजगी दोन्ही क्षेत्रात हे काम सुरु आहे. आरोग्य यंत्रणेमार्फत दैनंदिन सर्वेक्षण, संपर्क शोध, किरकोळ आजार ते गंभीर आजारी रुग्णांचे अति दक्षता विभागातील व्यवस्थापन इत्यादी कार्य अव्याहतपणे सुरु आहे. या प्रक्रियेमध्ये आरोग्य यंत्रणेतील अनेकांना कोविड लागण झाली. काहींना आपले प्राण गमवावे लागले. तरीही माघार न घेता आरोग्य यंत्रणेतील आपले कोविड योद्धे कोरोना प्रतिबंधाचे कार्य करीत आहेत व या पुढेही हे कार्य असेच सुरु राहणार आहे. शासनाने या फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या कर्मचारी, अधिका-यांना लस देण्याचा निर्णय घेतल्याने दिलासा मिळेल.- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी ---------- कोरोना परतीच्या मार्गावर पुणे जिल्ह्यात ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात आलेली कोरोनाची लाट हळुहळु कमी होत आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या पिक टाईममध्ये एका दिवसात अडीच,तीन हजार रुग्ण सापडत होते. तर दररोज ८० ते ९० मृत्यू होत होते. हीच संख्या आता तब्बल ५०० पर्यंत खाली आली आहे. मंगळवार (दि.३) रोजी पुणे जिल्ह्यात ५४६ नवीन रुग्ण सापडले व २८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला.--------1) जिल्ह्यात आज अखेर ॲक्टिव्ह रुग्ण : ५०८१2) हाॅस्पिटलमध्ये उपचार घेणारे : ५०८१3)घरीच उपचार घेतात : ६३९५
पुण्यात सर्वात आधी सव्वा लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळणार कोरोनाची लस : डाॅ.राजेश देशमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2020 12:13 PM
लस उपलब्धतेनंतर ती वेगाने जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू...
ठळक मुद्देगेल्या आठ-नऊ महिन्यांपासून शासकीय व खाजगी दोन्ही क्षेत्रात हे काम सुरु