पुणे : पुणेकरांची शनिवारची पहाट ही नेहमीपेक्षा वेगळी आणि तितकीच प्रेरणादायी व अविस्मरणीय अशी ठरली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद हा अभिमानास्पद व दिलासादायक असा होता. खासकरून पुण्यातील ससून, दीनानाथ मंगेशकर, कमला नेहरू, रुबी हॉल, भारती हॉस्पिटल, सुतार दवाखाना,यांसारख्या हॉस्पिटलमध्ये आकर्षक रांगोळ्या, फुलांची आरास यांनी ओसंडून वाहणारा आनंद, उत्साह, धावपळ आणि यांसोबतच शिगेला पोहचलेली उत्सुकता हे दृश्य फारच भारावून टाकणारे होते. याला निमित्त होते पुणे शहरातील ऐतिहासिक कोरोना लसीकरणाचे.. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषणानंतर कोरोना लसीकरणाला देशात शुभारंभ झाला. आणि पुण्यात देखील कोरोनाची पहिली लस टोचण्यात आली.
पुणे शहरात सकाळपासूनच कोरोना लसीकरणाची जोरदार तयारी सुरु होती. शहरातील ससून, दीनानाथ मंगेशकर, कमला नेहरू, रुबी हॉल, भारती हॉस्पिटल, सुतार दवाखाना अशा प्रमुख रुग्णालयातील लसीकरणासाठीचे कक्ष-निरीक्षण कक्ष, आरोग्य कर्मचारी सज्ज होते. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल आदी उपस्थित होते.
पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये डॉ. अनुज दरग यांना ११ वाजून ०५ मिनिटांनी पहिली लस देण्यात आली. कमला नेहरू रुग्णालयात डॉ. विनोद शहा यांना पहिली लस देण्यात आली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील डॉ. नितीन उगले यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पहिली लस घेतली. लस घेऊन अर्धा तास निरीक्षण कक्षात थांबल्यानंतर ते पुन्हा ड्युटीवर जॉईन झाले. यानंतर रुबी हॉल, सुतार दवाखाना या ठिकाणी देखील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सुतार दवाखान्यात, मंदाकिनी कवतिके यांनी कल्पना जाधव स्टाफ नर्स यांंना पहिली लस दिली. लस देताना त्यांना लस कशासाठी आहे, कोणत्या कंपनीची आहे, पुढील लस कधी देणार अशी माहिती दिली व त्यानंतर लस देण्यात आली. दुसरी लस अनिल ठोंबरे यांना देण्यात आली.
येरवडा येथील राजीव गांधी हॉस्पिटल येथे डॉ. सुभाष कोकणे यांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली.
भारती हॉस्पिटल मधील 100 डॉक्टरांना आज लस देण्यात येणार
भारती हॉस्पिटल मधील 100 डॉक्टरांना आज लस देण्यात येणार आहे. डॉ. अनुज दरग यांना ११ वाजून ०५ मिनिटांनी पहिली लस देण्यात आली. त्यानंतर डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. सुमिरन महाजन, डॉ. दिनेश श्रीहरी आणि डॉ. सायली देशपांडे या पाच जणांना लस देण्यात आली. यावेळी महापालिकेच्या क्षेत्रीय आरोग्य अधिकारी डॉ. विद्या नागमोडे, भारती हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. संजय ललवाणी यांच्यासह नर्स उपस्थित होत्या. यावेळी रुग्णालय प्रशासन आणि महापालिकेकडून लसीकरणाची चोख व्यवस्था करण्यात आलेली होती. लसींचा पुरेसा साठा देण्यात आलेला होता. त्यासाठी डॉक्टर, पाच नर्स, डाटा एंट्री ऑपरेटर, सुरक्षा रक्षक यांची व्यवस्था करण्यात आली होती.
ससून रुग्णालयातील डॉ. मुरलीधर तांबेंना सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी कोरोनाची लस टोचण्यात आली आहे. ससून हॉस्पिटलच्या डॉक्टर डॉ. प्रज्ञा शिंदे यांनी लस कशी दिली जाते याची माहिती दिली.
येरवडा - संपूर्ण देशात आज पासून कोवीशिल्ड लसीच्या पहिल्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली. पुणे महापालिकेच्या येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात डॉ. सुभाष कोकणे (वय 69) यांना पहिली लस देण्यात आली. डॉ. सुभाष कोकणे हे येरवडा परिसरातील ज्येष्ठ डॉक्टर असून पुणे महापालिका आरोग्य विभाग सोबत गेली अनेक वर्ष सेवा करीत आहेत.
रुबी हॉलमध्ये लस घेण्याची उत्सुकता
रुबी हॉल रुग्णालयाच्या वतीने सुरुवातीला पहिल्या शंभर कर्मचाऱ्यांना लस देण्यासाठी यादी तयार करण्यात आली होती. मात्र महानगरपालिकेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या यादीनुसार आणि नियमानुसारच लसीकरण प्रकिया राबविली जात आहे. विभाग प्रमुख म्हणून मला प्रथम लस मिळेल असे वाटले होते . लस घेण्याची उत्सुकता आहे. या टप्प्यानंतर आता पुढील यादी देखील महानगरपालिकाच तयार करणार आहे. रुग्णालयातील डॉक्टरांपासून ते सफाई कर्मचाऱ्या पर्यंत सुमारे साडेतीन हजारहुन अधिक कर्मचाऱ्यांच्यानावांची यादी तयार करण्यात आलेली आहे. यानंतर अत्यावश्यक सेवा विभाग तसेच ५० वर्षावरील कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. टप्प्याने महानगरपालिकेच्या नियमानुसार लसीकरण केले जाणार आहे. अशी माहिती लसीकरण केंद्रयाच्या प्रमख व रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. करमरकर यांनी दिली. - डॉ. मनीषा करमरकर, केंद्र प्रमुख