प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : जगभरात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या कोरोनाबाधित रुग्णांना जीवनदान देण्यासाठी प्लाझ्मा थेरपी सध्या उपयुक्त ठरत आहे. मात्र, पुरेसे दाते उपलब्ध होत नसल्याने प्लाझ्मा थेरपीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. कोरोनामुक्त रुग्णांनी आपणहून पुढे यावे, असे आवाहन सातत्याने करण्यात येत आहे.
अन्न आणि औषध प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, ८ जुलैपर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे ३६५ जणांनी प्लाझ्मा दान केले आहे. त्यापैकी २७१ जणांचा प्लाझ्मा रुग्णांना देण्यात आला आहे. रक्तपेढ्या, रुग्णालये, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक आणि दाते यांच्यात योग्य समन्वय निर्माण झाल्यास प्लाझ्मा थेरपीची गरज असणाऱ्या रुग्णांची गरज वेळेत पूर्ण होऊ शकते.
रक्ताचे नाते ट्रस्टचे राम बांगड म्हणाले, 'पुणे, मुंबई, ठाणे येथून प्लाझ्मासाठी अनेक फोन येत आहेत. प्रत्येकाने फक्त एक डोनर शोधला तरी प्लाझ्माचा तुटवडा कायमचा दूर होईल. एक डोनर शोधणे अवघड नाही. रक्ताचे नाते मदतीसाठी प्रयत्नशील आहे. दात्यांनीही आपणहून पुढे यायला हवे.'
------
शासनाकडून किंवा महापालिकेकडून कोरोनामुक्त होऊन २८ दिवस झालेल्या रुग्णांची यादी प्रसिद्ध केल्यास प्लाझ्मा दात्यांशी संपर्क साधणे सोपे होऊ शकेल. नातेवाईकांनीही दाते शोधण्यास प्रयत्न करायला हवा. रक्ताचे नाते ट्रस्टची कळकळीची विनंती आहे की दात्यांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी आपणहून पुढे यावे.
- राम बांगड, रक्ताचे नाते ट्रस्ट
------सध्या प्लाझ्मासाठी दररोज ४-५ फोन येतात. मात्र, तेवढा प्लाझ्मा उपलब्ध होत नाही. कारण प्लाझ्मा देण्याबाबत अद्याप पुरेशी जागृती झालेली नाही. त्यामुळे लोक येत नाहीत. आम्ही प्रयत्न करत आहेत. तसेच रुग्णांच्या नातेवाईकानंही दाते मिळवण्यासाठी सांगत आहोत - डॉ. अतुल कुलकर्णी, संचालक, जनकल्याण रक्तपेढी
----रुग्णालयात दहा दिवसांपुर्वीच प्लाझ्मा संकलन सुरू झाले आहे. आतापर्यंत सुमारे ४० जणांनी प्लाझ्मा दान केले आहे. दररोज इतर रुग्णालयांकडूनही प्लाझ्मासाठी विचारणा होते. पण तेवढा प्लाझ्मा उपलब्ध होत नाही. ठराविक रक्तगट जुळत नसल्याने प्लाझ्मा देता येत नाही. सध्या सर्व रक्तगटांचे दाते मिळतातच असे नाही. पण मागणी वाढत असल्याने दात्यांनीही पुढे यायला हवे.- डॉ. स्मिता जोशी, रक्तपेढी प्रमुख, सह्याद्री हॉस्पीटल-------------------सध्या रुग्णालयात दररोज ४ ते ६ दाते येत आहेत. जुलै महिन्यापासून आतापर्यंत ९५ दात्यांनी प्लाझ्मा दान केले आहे. त्यातून २४० बॅग तयार केल्या असून त्यापैकी २२० बॅग महापालिकेच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालयातील रुग्णांना दिल्या आहेत. प्लाझ्माची मागणी वाढली असून दात्यांमध्येही जनजागृती निर्माण होत आहे. हे प्रमाण आणखी वाढायला हवे.- डॉ. तुषार पाटील, रक्तपेढी प्रमुख, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, पिंपरी चिंचवड---------------------प्लाझ्मा दान कोण करू शकते?
*ज्या पुरुषाला कोरोनामधून बरे होऊन हॉस्पिटलमधून डिसचार्ज होऊन २८ दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत* ज्याचे वजन ५५ किलो किंवा जास्त आहे.* वय १८ ते ६० वर्षे आहे.* बीपी, शुगर, दमा असा कोणताही विकार नाही, असा कोणताही नागरिक प्लाझ्मा देऊ शकतो.* प्लाझ्मा घेताना जास्त रक्त काढले जात नाही. फक्त ५० मिली रक्त वापरले जाते.* डोनरच्या टेस्ट मोफत घेतल्या जातात.* अर्ध्या तासात दोघांना जीवदान करण्याचे पुण्य मिळते.